काटोल :- रामटेक विभागाचा यंदाचा देवर्षी नारद पत्रकार सन्मान काटोलचे अनिल सोनक यांना देण्यात आला. सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे सत्काराचे स्वरूप होते. विश्वेश्वर वाचनालयाच्या सहयोगाने घेण्यात आलेल्या समारंभात व्यापीठावर प्रमुख अतिथी प्रशांत पाचपोर, प्रमुख वक्ता प्रा. सुभाष लोहे, संस्थेचे अध्यक्ष दीपक केणे, विभाग प्रचार प्रमुख सौगत नंदी, काटोल प्रचार प्रमुख विष्णू माचेवार आणि रामटेक विभाग सहकार्यवाह जयंत कळंबे उपस्थित होते.
अनिल सोनक यांनी आपल्या सामाजिक जीवनाची सुरुवात विद्यार्थी दशेतच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून केली. पुढे महाविद्यालयीन काळात एनसीसीचे बेस्ट कॅडेट म्हणून राजपथ परेडमध्ये सहभाग घेतला. शिक्षण पूर्ण करुन दीर्घकाळ मार्केटिंग क्षेत्रातील कामातून निवृत्ती घेऊन पत्रकारितेत पुण्यनगरी या दैनिकातून कार्याला सुरुवात केली व आपल्या कार्याचा ठसा पत्रकारिता क्षेत्रात उमटवला. सध्या ते नागपूर मेट्रो या वृत्तपत्रात कार्यरत आहेत.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा. सुभाष लोहे म्हणाले, पत्रकारांकडून लोकशिक्षणाची अपेक्षा असते. समाजहितासाठी वेळप्रसंगी ते जीवाचा धोका पत्करुन आपले कर्तव्य पार पाडत असतात. अशाच पत्रकारांमध्ये अनिल सोनक यांची गणना होते.
लोकसभा निवडणुकीच्या काळात देशातील लोकशाही आणि संविधान धोक्यात असल्याचा भ्रम पसरवला गेला. 1975 साली भारतीय संविधानावर आघात करून, त्यात खोडतोड करणाऱ्यांना भारतीय मतदारांनी सत्तेपासून दूर ठेवले. “संविधान खतरे में है असे म्हणणारेच आता कात्रीत सापडले आहेत”, ही वास्तविकता श्रोत्यासमोर मांडतांनाच पत्रकारांनी सत्य समाजासमोर मांडले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. सुभाष लोहे यांनी केले.
राम राज्यापासून या भारत भूमीवर लोकशाही नांदत आली आहे, याकडे प्रा. लोहे यांनी लक्ष वेधले. स्वातंत्र्यानंतर संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, हीच संकल्पना मांडली असे सांगून ते म्हणाले की, लोकशाहीमुळे मिळालेल्या अधिकारांचा सर्वांना लाभ घेता यावा, याची व्यवस्था समाजानेच करायची असते. म्हणूण ही सामाजिक लोकशाही आहे. ही भक्कम राहण्यासाठी भारतीय समाजासोबतच पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. अधिकार व कर्तव्य या लोकशाहीच्या नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळेच स्वैराचारावर योग्य बंधनाचा अंकुश राहतो. हा अंकुश ठेवण्याचे काम पत्रकार करतात. देवर्षी नारद यांच्या मानवकल्याणाच्या आणि लोकमंगलाच्या भूमिकेवरही त्यांनी प्रकाश टाकला. प्रशांत पाचपोर यांनी यावेळी पत्रकारांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली. सौगत नंदी यांनी पत्रकारितेत सतत होत असलेल्या प्रयोगांमुळे संवाद माध्यमे गतिमान होत असल्याचे सांगितले. ही वाटचाल देवर्षी नारदांपासून चालत आली आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाला मान्यवर पत्रकार व समाजातील प्रबुद्धजन बहुसंख्येने उपस्थित होते. प्रस्ताविक आशुतोष कात्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन विष्णू माचेवार यांनी केले.