नागपूर :- राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील विद्यार्थ्यांच्या नवसंकल्पनांचा शोध घेणे व त्यांचे नवउद्योजकतेचे स्वप्न साकार करण्यासाठी योग्य ते पाठबळ पूरवणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. दुस-या टप्यात जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील एकूण 70 स्पर्धकांची निवड करण्यात आलेली होती, त्याअनुषंगाने निवड झालेल्या सर्व स्पर्धकांचे जिल्हास्तरावर सादरीकरण के. डी. के. इंजिनिअरींग कॉलेज येथे आज आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमास के.डी.के. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. सी.सी. हांडा, उपप्राचार्य डॉ. ए.एम. बदर, बेझलवार, उपप्राचार्य, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्र, जिल्हा उद्योग केंद्रातील अधिकारी चोरपगार, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, असिस्टंट प्रोफेसर डॉ. ए. पी. निनावे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी दि. अ. जामदार उपस्थित होते.
कार्यक्रमास एकूण 113 उमेदवार नवसंकल्पना सादरीकरणाकरिता उपस्थित होते. उमेदवारांना संकल्पनेबाबत परिपूर्ण माहिती घेऊन सादरीकरणानुसार उमेदवारांना गुणांकन करण्याकरिता विविध क्षेत्रातील नामांकित असे 20 ज्युरी उपस्थित होते. सदर सादरीकरण सत्रातून 10 विजेते निवडलेले असून प्रत्येक विजेत्याला 1 लाख रुपये बीज भांडवल देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील 10 नवउद्योजकांना 12 महिन्यांचा विशेष इन्क्युबेशन प्रोग्राम व इन्क्युबेशन प्रोग्राम नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील 360 संकल्पनांचे राज्यस्तरीय सादरीकरण करण्यात येणार असून सर्वोकृष्ट 10 नवउद्योजकांना प्रत्येकी 5 लाखांचे बीज भांडवल देण्यात येणार आहे.
जिल्हा समन्वयक योगेश अ. कुंटे, यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. नेहा जाधव, कुणाल पवार, गजानन हिवरकर , राजभूषण श्रीवास यांनी जिल्हास्तरीय सादरीकरणाकरिता परिश्रम घेतले.