नागपूर :- मूल्ये आणि मानवी नैतिकता ही नागरी समाजाची बलस्थाने असून प्राचीन परंपरा लाभलेले भारतीय मूल्ये जागतिक मूल्यांशी साधर्म्य दर्शवतात. गौतम बुद्धांचा ‘अत्त दीप भव’ अर्थात स्व्त:च स्वत:चा प्रकाश व्हा हा संदेश घेऊन जगातील नागरी संस्थांनी मानवी मुल्यांचे संवर्धन करावे, असा सुर सी-२० परिषदेच्या ‘नागरी संस्था आणि मानवी मुल्यांचे संवर्धन’ या विषयावरील परिसंवादात व्यक्त करण्यात आला.
सेवा इंटरनॅशनलचे जागतिक समन्वयक श्याम परांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या परिसंवादात कोल्हापुर येथील साहस दिव्यांग संशोधन संस्थेच्या नसीमा हुरझूक, भारतीय सांस्कृतिक अभ्यास परिषदेच्या अध्यक्ष डॉ. शशीबाला, १०० मिलीयन कँपेनचे जागतिक संचालक ओवेन जेम्स ,अर्श विज्ञा गुरुकुलमचे स्वामी परमात्मानंद, युनायटेड कॉन्श्सनेस ग्लोबलचे समन्वयक डॉ. विक्रांत तोमर, इंडियन सोशल रिस्पॉन्सिब्लिटी नेटवर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष गुप्ता, गुवाहाटी येथील विवेकानंद सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष डॉ. जोराम बेगी, सेंट्रल ऑफ पॉलिसी ॲनालिसिसचे कार्यकारी अध्यक्ष दुर्गानंद झा यांनी मांडले.
भारताला मूल्यांची प्राचीन परंपरा असून ती जागतिक मुल्यांशी साधर्म्य दर्शवतात असे सांगत श्याम परांडे यांनी मानवी मुल्यांचा परामर्श घेतला. सी-२० परिषदेत सहभागी कार्यकर्ते आणि प्रतिनिधींनी नैतिक मुल्यांच्या आधारे आणि गौतम बुद्धांच्या ‘अत्त दीप भव’ या संदेशाचा अंगीकार करून कार्य मानवी मुल्यांचे संवर्धन करावे अशा भावनाही त्यांनी व्यक्त केल्या.
निसर्गाने आपल्याला सर्व काही दिले असून आपण कशाचेही मालक नाही हे समजून घ्या असे स्वामी परमात्मनंदा म्हणाले. समाजातील प्रत्येकाचा आदर करत इतरांच्या अधिकारांची पायमल्ली होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
संतोष गुप्ता यांनी सेवाभावाने कार्य करण्याचे आवाहन केले. जगातील विविध धर्मांमध्ये करण्यात आलेल्या सेवेच्या व्याख्येवर त्यांनी प्रकाश टाकला.
आफ्रिका उपखंडातील सहारा भागातील असमानतेचा दाखला देत ओवेन जेम्स यांनी असमान विकासाबाबत विचार मांडले. आफ्रिकेकडे अनेक सर्वोत्तम नैसर्गिक संसाधने असताना हा भाग अविकसित राहिल्याचे सांगून आफ्रिकेतील मुलांना न्याय देण्याचे आवाहन त्यांनी केले. सहभागी मान्यवरांनीही यावेळी विचार मांडले.