अयोध्येत नव्याने बांधलेल्या श्री रामजन्मभूमी मंदिरातील श्री रामलल्लाच्या 22 जानेवारी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पंतप्रधान होणार सहभागी

– कुबेर टीला इथल्या भगवान शिवशंकराच्या जीर्णोद्धार झालेल्या प्राचीन मंदिरालाही पंतप्रधान भेट देणार

– प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक समुहांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 च्या सुमाराला अयोध्येतील नवनिर्मित श्री रामजन्मभूमी मंदिरात श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होतील. श्री रामजन्मभूमी ट्रस्ट कडून याआधी ऑक्टोबर 2023 मध्ये, पंतप्रधानांना प्राण प्रतिष्ठा समारंभासाठी निमंत्रण मिळाले होते.

ऐतिहासिक अशा या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याला देशातील सर्व प्रमुख आध्यात्मिक आणि धार्मिक समुहांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. विविध आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींसह समाजाच्या सर्व स्तरातील लोकही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मान्यवरांना यावेळी संबोधित करतील.

श्री रामजन्मभूमी मंदिराच्या उभारणीत योगदान दिलेल्या श्रमिकांशी पंतप्रधान संवाद साधतील. कुबेर टिला इथल्या भगवान शिवशंकराच्या जीर्णोद्धार झालेल्या प्राचीन मंदिरालाही पंतप्रधान भेट देणार आहेत. या जीर्णोद्धार केलेल्या मंदिरात दर्शन घेऊन ते पूजाही करणार आहेत.

भव्य श्री रामजन्मभूमी मंदिर पारंपरिक नागर शैलीत बांधले गेले आहे. त्याची लांबी (पूर्व-पश्चिम) 380 फूट आहे; रुंदी 250 फूट आणि उंची 161 फूट आहे; आणि या मंदिरात एकूण 392 खांब तर 44 दरवाजे आहेत. मंदिराचे खांब आणि भिंतींवर हिंदू देव, देवतांच्या प्रतिमा साकारण्यात आल्या आहेत. मुख्य गाभाऱ्यात भगवान श्री राम (श्री रामलल्लाची मूर्ती) यांचे बालपणीचे रूप स्थापित करण्यात आले आहे.

मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला आहे, सिंहद्वारातून 32 पायऱ्या चढून या मंदिराकडे जाता येते. मंदिरात एकूण पाच मंडप (हॉल) आहेत – नृत्य मंडप, रंग मंडप, सभा मंडप, प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप. मंदिराजवळ एक ऐतिहासिक विहीर (सीताकूप) आहे, जी अति प्राचीन काळातील आहे. मंदिर परिसराच्या नैऋत्य भागात, कुबेर टिला येथे, भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला असून जटायूच्या शिल्पाची स्थापना करण्यात आली आहे.

मंदिराचा पाया 14-मीटर जाड रोलर कॉम्पॅक्टेड काँक्रीट (RCC) च्या थराने बांधण्यात आला आहे, यामुळे त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिराच्या उभारणीत कुठेही लोखंडाचा वापर केलेला नाही. जमिनीतील ओलाव्यापासून मंदिराचे संरक्षण करण्यासाठी ग्रॅनाइटचा वापर करून 21 फूट उंचीचा प्लिंथ बांधण्यात आला आहे. मंदिर संकुलात सांडपाणी प्रक्रिया केंद्र, जलशुद्धीकरण केंद्र, अग्निसुरक्षेसाठी पाणीपुरवठा आणि स्वतंत्र वीज केंद्र आहे. देशातील पारंपारिक आणि स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून हे मंदिर बांधण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महासंस्कृती महोत्सवात भक्तीगीत गायक हंसराज रघुवंशी यांची दमदार प्रस्तुती

Mon Jan 22 , 2024
– प्रेक्षकांनी गायनातून अनुभवले भक्तीमय वातावरण – आज सिंधुरागिरी महानाट्य सादर होणार नागपूर/रामटेक :- प्रसिद्ध भक्तीगीत गायक हंसराज रघुवंशी यांनी सादर केलेल्या भगवान श्रीराम, भगवान शंकर आदींवरील एकापेक्षा एक सरसभक्ती रचनांनी महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रसिक प्रेक्षक भक्ती रसात न्हाहून निघाले. येथील नेहरू मैदानावर सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.खासदार कृपाल तुमाने,आमदार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!