घड्याळ्याचे काटे फिरले उलटे! 36 लाखांचे काम अवघ्या पावणे 2 लाखांत 

नागपूर (Nagpur) : तब्बल ३६ लाखांचे काम अवघ्या पावणे दोन लाखांत कोण करणार, असा प्रश्न पडणे सहाजिकच आहे. आवळा दाखवून भोपळा काढण्याचा हा प्रकार असावा, अशी शंकाही येऊ शकते. मात्र नागपूर महापालिकेने (NMC) काढलेल्या क्लॉक टॉवरच्या टेंडरचे (Clock Tower Tender) काटे उलटे फिरले. एचएमटी (HMT) कंपनीने हे काम अवघ्या पावणे दोन लाखात करण्याची तयारी दर्शवली आहे.

क्लॉक टॉवर व परिसराचे सौंदर्यीकरण, देखभाल व दुरुस्तीकरिता महापालिकेने स्वारस्य टेंडर मागवल्या होत्या. दरबार वॉच या कंपनीने वार्षिक ३६ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव दिला होता. एवढेच नव्हे या कंपनीने १० वर्षासाठी शहरात जाहिरातीचे फलक उभारून अधिकार देण्याची मागणी केली होती. महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. याकामासाठी घड्याळ्याची निर्मिती करणाऱ्या एचएमटी कंपनीशी संपर्क साधला. या कंपनीने क्लॉक टॉवर दुरुस्तीसाठी केवळ १ लाख ७२ हजार ६५२ रुपयांचा प्रस्ताव दिला होता. आयुक्तांनी हा प्रस्ताव तत्काळ मंजूर केला.

जी-२० आंतरराष्ट्रीय परिषदेअंतर्गत बैठकीसाठी शहराचा कायापलट सुरू असून, सौंदर्यीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यानिमित्त अजनी चौकही येत्या काळात आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. येथे क्लॉक टॉवर परिसरात कारंजा तयार करण्यात आला असून, त्यावरील रंगबिरंगी दिव्यांची रोषणाई नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता येथे ‘आम्ही नागपुरी’ असा सेल्फी पॉईंट तयार करण्यात येणार आहे.

वर्धा मार्गावर अजनी चौकातील क्लॉक टॉवरची टिकटिक पुन्हा सुरू झाली असून, दूरवरून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या क्लॉक टॉवरच्या सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण होत असून नव्या वर्षात, एका नव्या लूकमध्ये क्लॉक टॉवर नागपूरकरांना पाहायला मिळणार आहे. क्लॉक टॉवर परिसरात सुंदर बाग तयार करण्यात आली आहे. सायंकाळी रंगबिरंगी रोषणाईने क्लॉक टॉवर व या परिसराचे सौंदर्य आणखी खुलले दिसून येत आहे. येथील कारंजे नागरिकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. देशात कुठेच या स्वरूपात क्लॉक टॉवर नसून अथक प्रयत्नांनी सुरू झालेली घडी पुन्हा बंद होऊ नये यादृष्टीने प्रणाली विकसित केल्या जात आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नवीन कामठी पोलीस स्टेशन येथे महिला दक्षता समितीची सभा

Thu Jan 5 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 05 :- महिला दक्षता समिती ही पोलीस स्टेशन मध्ये महिला सेलच्या माध्यमातून आलेल्या तक्रारी समुपदेशनाच्या माध्यमातून सोडविणे तसेच एखादी तक्रारदार पीडित महिला झालेल्या अत्याचार विरोधात पोलिस स्टेशनला गेली असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केली असता पुढाकारातून तक्रार नोंदविण्याचे काम करीत असते यानुसार नवीन कामठी पोलीस स्टेशनला महिला पोलिस उपनिरीक्षक गीता रासकर यांच्या अध्यक्षतेखाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com