नागपूर :- ऑरेंज सिटी स्ट्रीट येथील भाजी बाजार व मटन बाजारासह इतर छोट्या विक्रेत्यांना सोयीसुविधा पुरविण्यात कुठलीही तडजोड करू नका, अशी सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी (शनिवार) केली.
जयाताळा मार्गावरील या बाजारावर अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नाही, याची पूर्ण काळजी घेण्याची गरज आहे, असेही ना. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. मंत्री महोदयांच्या निवासस्थानी यासंदर्भात बैठक पार पडली. या बैठकीला आमदार प्रवीण दटके, माजी नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, महानगरपालिकेचे मुख्य अभियंता गायकवाड, अधीक्षक अभियंता तालेवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (महामार्ग) कार्यकारी अभियंता बोरकर, भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे महाव्यवस्थापक वालदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वरिष्ठ संचालक आबिद रुही आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. नवीन आराखडा तयार करताना विमानतळ प्राधिकरणाचे नियम तपासून बघावेत, असेही ना. गडकरी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. बाजाराच्या परिसरातील पायाभूत सोयीसुविधा, स्वच्छता, ग्राहकांची सोय याचा आवर्जून विचार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बाजाराच्या परिसरातील वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होणार नाही, याचीही काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.