औरंगाबाद :- राज्याचे कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दांत टीका केल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. सत्तारांनी केलेल्या आक्षेपार्ह टीकेविरोधात मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सत्तारांच्या बंगल्याच्या काचा फोडल्याची घटना ताजी असताना औरंगाबादमधून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते अब्दुल सत्तार यांचं औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड येथील राहत्या घराच्या बाहेर दाखल झाले. तिथे त्यांनी सत्तारांच्या घरावर दगडफेक केली.
अब्दुल सत्तार यांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर औरंगाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक तरुण कार्यकर्ते सत्तारांच्या सिल्लोड येथील राहत्या घराबाहेर दाखल झाले.
कार्यकर्त्यांनी यावेळी अब्दुल सत्तार यांच्या बंगल्याच्या गेटवर चप्पल फेकल्या. काठ्या हाणल्या. तसेच सत्तारांच्या घरावर दगडफेक केली. यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण कार्यकर्ते इतके आक्रमक झाले होते की पोलिसांना देखील आवरणं कठीण होऊन बसलं होतं.
“अब्दुल सत्तार यांनी महिलांचा अपमान केलाय. त्यामुळे आम्ही त्यांच्या राजीनाम्याची मागणी करतोय. सत्तार जोपर्यंत सुप्रिया सुळे यांची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरावरच काय, तर त्यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर आंदोलन करु. सत्तार यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही”, अशी आक्रमक भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली.