प्यार फाऊंडेशन आणि चंद्रपूर मनपाच्या माध्यमातून सुरु आहे भटके श्वान/मांजरांची नसबंदी

चंद्रपूर :- शहरातील मोकाट,बेवारस,भटके श्वान व मांजर यांची संख्या नियंत्रित ठेवणे,रेबीज निर्मुलन व मनुष्य – प्राणी संघर्ष टाळणे या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिका व प्यार फाऊंडेशन द्वारे श्वान व मांजर निर्बीजीकरणाची मोहीम सुरु आहे. या मोहीमेअंतर्गत या वर्षी ४५० कुत्री तर २५ मांजरांचे निर्बीजीकरण करण्यात आले आहे.

मोकाट, भटके श्वान ही अनेक ठिकाणची गंभीर समस्या आहे. गाडीच्या मागे धावणे,चावा घेणे,रात्रीच्या वेळेस अंगावर धाऊन जाणे त्यामुळे अपघात होणे इत्यादी प्रकारचे त्रास या बेवारस कुत्र्यांमुळे होतात. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळं,अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी अनेक इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० व ॲनिमल बर्थ कंट्रोल २००१ नुसार कुत्र्यांना मारण्यास बंदी आहे. मात्र मोकाट, भटके श्वान यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जाते. यावर नियंत्रण आणण्यासाठी चंद्रपूर मनपाद्वारे सदर मोहीम राबविली जात आहे.

शहरातील मोकाट कुत्र्यांची नसबंदी करण्याची जबाबदारी पेटानिटी अँड ॲनिमल रिहॅबिलिटेटर्स (प्यार ) फाऊंडेशनकडे सोपविण्यात आली आहे. शहरात अंदाजे ८ ते ९ हजार बेवारस कुत्री असुन मनपातर्फे मागील वर्षी १५०० कुत्र्यांची नसबंदी करण्यात आली होती. कुत्र्यांप्रमाणेच मांजरांच्या संख्येतही भर पडत आहे. कुत्री वर्षांतून दोन वेळा तर मांजराचे चार वेळा प्रजनन होते. मांजर एका वेळी दोन ते पाच पिल्लांना जन्म देते. त्यामुळे मांजरांच्या संख्येत सुद्धा वाढ होत असल्याने निर्बीजीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

नसबंदीनंतर श्वानांना परत सोडणार – प्यार फाऊंडेशन येथे ११ ते ५ या वेळेत श्वान व मांजर यांचे निर्बिजीकरण व रेबीज लसीकरण करण्यासोबतच त्यांना होणाऱ्या इतर रोगांचेही निदान करण्यात येणार असुन त्यानंतर १ ते २ दिवस तिथेच ठेवण्यात येणार आहे.आक्रमक असलेल्या श्वानाला अधिक काळ ठेवण्यात येणार असून इतर श्वानांना परत त्यांच्या भागात सोडले जाणार आहे. त्याच भागात सोडणे आवश्यक असते कारण प्रत्येक कुत्र्याचा परिसर ठरलेला असतो. एका कुत्र्याच्या परिसरात दुसर्‍या कुत्र्याला प्रवेश करता येत नाही, अशा वेळी जर एके जागी पकडलेला श्वान दुसर्‍या जागी सोडला तर त्याला इतर त्याला मारून टाकतात.

आपल्या परीसरातील मोकाट कुत्रे व मांजरांची समस्या असल्यास तसेच पाळीव श्वान / मांजर यांचेही निर्बीजीकरण करावयाचे असल्यास सदर माहीती ९४२२५६७०३०,७५८८८९३९३९ या मोबाईल क्रमांकावर अथवा पेटानिटी अँड ॲनिमल रिहॅबिलिटेटर्स (प्यार ) फाऊंडेशन बालाजी मंदिराजवळ,दाताला रोड येथे देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

रेबीज – कुत्र्याला जर कुठल्याही कारणाने रेबीज या विषाणूची बाधा झाली तर तर तो पिसाळतो. रेबीजचे विषाणू हे लाळेवाटे पसरतात. जर कुत्रा दुसर्‍या कुठल्या रेबीज झालेल्या प्राण्याच्या (कुत्रा वा मांजर) यांच्या संपर्कात आला आणि त्या प्राण्यांनी कुत्र्याचा चावा घेतला तर, त्याच्याही शरीरात रेबीजचे विषाणू शिरतात आणि त्यालाही रेबीज होतो.रेबीजमुळे बाधीत प्राण्याच्या वा मनुष्याच्या मेंदू आणि मज्जारज्जू (spinal cord) वर परिणाम होतो. आणि त्यामुळेच त्याच्या वागणूकीत आक्रमकपणा दिसून येतो व समोरील व्यक्तीवर हल्ला करतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पोलिस ठाण्यातच पोलिसांशी जुंपली 'फ्री स्टाईल'

Thu Apr 13 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- कायद्याचे राज्य निर्माण व्हावे व नागरिकांना तडकाफडकी पोलिस सेवा मिळावी यासाठी पोलीस नियंत्रण कक्ष उभारले आहेत ज्यामुळे नागरिकांना वेळीच पोलीस सेवा मिळत असल्याने कित्येक गुन्ह्यावर आळा बसविण्यात पोलिसांना यशप्राप्त झाले आहे तर कायद्याचे रक्षक म्हणून कर्तव्यदक्ष भूमिका बजावणाऱ्या खाकी वर्दी परिधान केलेल्या पोलिसांनाच जर आरोपीताकडून मारहानी सारखे वर्तन होत असतील तर रक्षणाच्या हितासाठी हाक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com