ज्ञानोबा-तुकाराम पुरस्काराचे रविवारी आळंदी येथे होणार वितरण

मुंबई :- राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा ‘ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार’ आळंदी येथे रविवार २६ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता प्रदान करण्यात येणार आहे. ह.भ.प.बद्रीनाथ तनपुरे (२०१९-२०), ह.भ.प.बाबा महाराज सातारकर(२०२०-२१), स्वामी गोविंददेव गिरी (२०२१-२२), मा.बाभूळगांवर शास्त्री मंहत(२०२२-२३) यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

संत साहित्यावर उत्कृष्ट साहित्य लिहिणाऱ्या किंवा संतांना अभिप्रेत असलेल्या मानवतावादी कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तीला राज्य शासनाच्यावतीने प्रतिवर्षी ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्काराने’ सन्मानित करण्यात येते. ५ लाख रुपये रोख, मानपत्र तसेच मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

यापूर्वी रा. चिं. ढेरे, डॉ. दादा महाराज मनमाडकर, जगन्नाथ महाराज नाशिककर, रामकृष्ण महाराज लहवीतकर, डॉ. यू. म. पठाण, प्रा. रामदास डांगे, फादर फ्रान्सिस दिब्रेटो, श्रीमती उषा देशमुख, ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते, डॉ.किसन महाराज साखरे, मधुकर जोशी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

पुरस्कार प्रदान समारंभाप्रसंगी ‘भक्तीसागर’ या भक्तीमय सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. गायक अजित कडकडे, कार्तिकी गायकवाड, समीर अभ्यंकर, आसावरी, विशाल भांगे, भजनसम्राट ओमप्रकाश हे भक्तीगायनाचा कार्यक्रम सादर करणार असून कमलेश भडकमकर हे संगीत संयोजन करणार आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन प्राची गडकरी करणार असून पुरस्कार प्रदान समारंभप्रसंगी सांस्कृतिक कार्य संचालनालय निर्मित ‘अवघा रंग एक’ झाला व ‘हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील रॉबीनहूड दत्तोबा भोसले मातोळकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

हा कार्यक्रम विनामूल्य असून प्रेक्षकांना उपस्थित राहण्याचे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com