दिव्यांगत्व प्रमाणपत्र मोहिम सप्ताहाला सुरूवात

राष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त ६ डिसेंबरपर्यंत आयोजन : पहिल्याच दिवशी ३४० दिव्यांगांची नोंदणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नागपूर आणि जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांगत्व प्रमाणपत्र विशेष शिबिराला सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. गुरुवारी (ता.१) शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या परिसरात आयोजित शिबिराचे दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, विशेष अतिथि म्हणून, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राज गजभिये, मनपा समाजकल्याण विभागाचे उपायुक्त  प्रकाश वराडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार, समाजकल्याणचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, मनपा समाज विकास विभाग अधिकारी डॉ. रंजना लाडे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी किशोर भोयर आदी उपस्थित होते.

नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमधील दिव्यांगांना प्रमाणपत्र नोंदणीसाठी ६ डिसेंबरपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिसरात हे शिबिर असणार आहे. गुरुवारी १ डिसेंबर रोजी शिबिराच्या पहिल्या दिवशी लक्ष्मीनगर व धरमपेठ झोनमधील दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये पहिल्याच दिवशी ३४० दिव्यांगांनी नोंदणी केली व त्यातील २९० दिव्यांग प्रमाणपत्रासाठी पात्र ठरले. शिबिर परिसरात स्वीकार संस्था, संकल्प संस्था, समदृष्टी, संजय गांधी निराधार योजना, मतदार नोंदणी, बौद्धिक दिव्यांग, महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास मंडळ, जिल्हा विधी व सेवा प्राधिकरण, मनपा समाज विकास विभाग यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या स्टॉलला जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी भेट देउन माहिती घेतली. यावेळी त्यांनी दिव्यांगांसोबत चर्चा करून त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या.

शिबिरामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल)च्या दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील तज्ञांमार्फत दिव्यांगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्राकरीता निश्चिती करून ते पुढील प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार असल्याचे अभिजित राउत यांनी सांगितले.

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य असते. वेळेत दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळाले नसल्याने दरवर्षी शेकडो दिव्यांगांना शासकीय तथा इतर योजनेचा लाभ मिळण्यास दिरंगाई होते. प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ नुसार २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबन प्रणालीद्वारे निर्गमित दिव्यांगत्व प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. या दृष्टिकोनातून निर्धारित वेळेत दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळवून देण्याकरीता ३ डिसेंबर रोजी विशेष शिबिर राबविण्यात येत आहे.

शहरी भागातील दिव्यांग व्यक्तींकरिता स्वावलंबन या ऑनलाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) देण्यासाठी विशेष मोहिम कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शिबिरात दिव्यांगत्वाच्या २१ प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे दिव्यांग बोर्डाच्या तज्ञ डॉक्टरांमार्फत दिव्यांगत्व तपासणी व निदान करून त्यांना स्वावलंबन या ऑनलाईन पोर्टलद्वारे ऑनलाईन दिव्यांगत्व प्रमाणपत्र आणि वैश्विक ओळखपत्र (UDID CARD) स्पिड पोस्टने घरपोच देण्यात येणार आहे.

नागपूर शहरातील सर्व दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी तसेच आत्मनिर्भर करण्यासाठी नागपूर शहरातील मनपाच्या दहाही झोननिहाय शिबिर वेळापत्रकानुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथील दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय तज्ञ, डॉक्टर्स आणि व्यावसायिक तज्ञ डॉक्टर्स यांचेद्वारे शहरी भागातील दिव्यांग व्यक्तींची तपासणी व निदान करण्यात येईल.

अधिक महितीसाठी संपर्क क्रमांक

बौद्धिक दिव्यांगत्व /बहुदिव्यांग प्रवर्गातील व्यक्तींनी 7755923211, कर्ण-बधीर प्रवर्गातील व्यक्तींनी 7558495140 (SMS), अस्थिव्यंग प्रवर्गातील व्यक्तींनी 7756855077, अंध प्रवर्गातील व्यक्तींनी 7262801201, अध्ययन अक्षम/ ऑटिझम व्यक्तींनी 7385753211 आणि सिकल सेल/ थेलेसेमीया/ हेमेफिलिया बाधित व्यक्तींनी 7387095077 या क्रमांकांवर संपर्क साधावा.

शिबिराद्वारे जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना लाभ मिळवून देण्यासाठी नागपूर महानगरपालिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), जिल्हा समाजकल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, शिक्षणाधिकारी, वैद्यकीय प्रमाणपत्र मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टर्स तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक, अभिजीत राऊत आणि त्यांचे सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

PM pays tributes to HH Pramukh Swami Maharaj Ji on his Jayanti

Fri Dec 2 , 2022
NEW DELHI :-The Prime Minister,  Narendra Modi has paid tributes to HH Pramukh Swami Maharaj Ji on his Jayanti. In response to a tweet by BAPS Swaminarayan Sanstha, the Prime Minister tweeted; “I pay my tributes to HH Pramukh Swami Maharaj Ji on his Jayanti. I consider myself blessed that I got the opportunity to interact with him on multiple […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com