शिवसेना – वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात – अजित पवार

आज उध्दव ठाकरे यांच्या भेटीनंतर भूमिका मांडू…

मुंबई  :- शिवसेना – वंचित यांच्या युतीबाबत आमच्या नाराजीचा प्रश्न येतो कुठे? का गैरसमज पसरवत आहात असा थेट सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांना केला.

राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालय पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली.

उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेबरोबर वंचितने युती केली हे माध्यमातून समजले आहे. उध्दव ठाकरे यांची आज मी आणि आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भेट घेणार आहोत त्यावेळी यावर स्पष्टपणे चर्चा करु व त्यानंतर आमची भूमिका मांडू असे स्पष्ट करतानाच उध्दव ठाकरे यांनी कुणाला मित्रपक्ष म्हणून घ्यायचं व त्यांच्या कोट्यातून घ्यायचं हा सर्वस्वी त्यांचा अधिकार आहे असे अजित पवार म्हणाले.

राजकारणात मागच्या निवडणुकीत कुणी जागा पाडल्या याला काही अर्थ नसतो. राजकारणात येणाऱ्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून आराखडे आखावे लागतात व राजकीय भूमिका मांडावी लागते. युती – आघाडी होते त्यावेळी ‘मागचं झालं गेलं गंगेला मिळालं’ असं करुन पुढे गेलो तरच योग्य गोष्टी घडतात असे स्पष्ट मतही अजित पवार यांनी व्यक्त केले.

मुळात मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची ताकद आहे हे निर्विवाद सत्य आहे त्यामुळे याअगोदरच उध्दव ठाकरे यांच्यासोबत आम्हाला बरोबर घ्या अशी सकारात्मक चर्चा झाली होती अशी माहितीही अजित पवार यांनी यावेळी दिली.

चिंचवड आणि कसबा या दोन्ही जागांसंदर्भात पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. आघाडी म्हणून शिवसेना, कॉंग्रेससोबत चर्चा करतोय. याशिवाय जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन या निवडणूका लढवल्या जाव्यात ही भूमिका असून याबाबत अंतिम निर्णय झाल्यावर माध्यमांना सांगितला जाईल असेही अजित पवार म्हणाले.

एखाद्याची महत्त्वाची नेमणूक ज्यांनी केली आहे त्यांच्याकडे इच्छा व्यक्त करायची असते त्यातूनच राज्यपालांनी ती इच्छा व्यक्त केली असावी असे मत अजित पवार यांनी व्यक्त केले.

आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीमध्ये संघटना वाढ, विधानपरिषदेच्या निवडणूका, चिंचवड व कसबा पोटनिवडणुक आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत काय नीती असावी याबाबत चर्चा झाल्याची माहितीही अजित पवार यांनी दिली.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com