काटोल :- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अनुषंगाने सुरू करण्यात आलेल्या “जन्मतः बाळाचे आधार नोंदणी” या लाभदायी अभियानाची सुरुवात दिनांक 24 नोव्हेंबर 2022 रोजी काटोल ग्रामीण रुग्णालय येथे काटोल ग्रामीण रुग्णालय आणि काटोल पोस्ट ऑफिस यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली.
या “जन्मतः बाळाचे आधार नोंदणी ” अभियानाची सुरुवात करताना तब्बल 5 जन्मजात बालकांची आधार नोंदणी करण्यात आली आणि सोबतच त्यांना जन्म प्रमाणपत्र ही वितरित करण्यात आले.
बाळाचे आधार तयार करण्यासाठी त्यांच्या पालकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. बाळाचे आधार कार्ड तयार करताना बाळाचे आधारशी मोबाईल क्रमांक ही जोडला जातो. त्या मोबाईल वर लगेच आधार नोंदणी चा रजिस्ट्रेशन क्रमांक पाठविण्यात येतो. काही दिवसांनी पोस्ट ऑफिस मार्फत वितरित केले जाईल.
अशा या महत्वपूर्ण अभियानाची यशस्वीपणे सुरुवात करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय काटोल च्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ.दिनेश डवरे यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाखाली डॉ. नरेंद्र डोमके , डॉ. सुधीर वाघमारे, मेश्राम, परिचारिका पुजा तिवारी, नेहा पजारे, पुजा धुर्वे यांनी चांगली मेहनत घेतली. यासोबतच काटोल पोस्ट ऑफिस च्या वतीने सब पोस्टमास्तर भुषण वाघमारे यांच्या मार्गदर्शनात संजय अडकणे, इमरान खान, प्रेमदास भोसे यांनी कसोशीने प्रयत्न करून संपूर्ण बाल आधार नोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली.