– खासदार भजन स्पर्धेचे थाटात उद्घाटन
नागपूर :- भजन किंवा भक्तीगीत गाताना आपल्या मनावर अध्यात्मिक संस्कार होतातच, शिवाय जी स्त्रीशक्ती भजन गात असते तिच्या माध्यमातून कुटुंबावरही अध्यात्मिक संस्कार होत असतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कांचन गडकरी यांनी आज (शुक्रवार) येथे केले.
केंद्रीय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या खासदार भजन स्पर्धेचे कांचन गडकरी यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. वर्धा मार्गावरील छत्रपती सभागृहात उद्घाटन सोहळ्यानंतर दक्षिण-पश्चिम विभागाची स्पर्धा झाली. यावेळी स्पर्धेच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचा आनंद घेण्याचे आवाहनही कांचन गडकरी यांनी स्पर्धकांना केले. या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते राजू हडप, दक्षिण पश्चिम मंडळाचे अध्यक्ष रितेश गावंडे, माजी नगरसेविका मीनाक्षी तेलगोटे, लक्ष्मी यादव, वनिता दांडेकर, वर्षा चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्ष प्रगती पाटील यांनी सर्व भजनी मंडळांना शुभेच्छा दिल्यात. दक्षिण-पश्चिम विभागामधून एकूण ५४ भजनी मंडळांनी सहभाग घेतला. २२ जानेवारीला होऊ घातलेल्या अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘श्रीराम भक्ती’ ही स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना ठेवण्यात आली आहे. प्रत्येक स्पर्धक भजनी मंडळाने दोन भजने सादर केली. त्यातील एक श्रीरामभक्तीचे गीत होते. स्पर्धेचे परीक्षण शिवांगी ढोक आणि अनुप तायडे यांनी केले. २० जानेवारीपर्यंत नागपूरकरांना भक्तीचा मेळा अनुभवता येणार आहे. सहा विभागांतून ३३८ उत्साही महिला व पुरुष भजनी मंडळांनी स्पर्धेसाठी नोंदणी केली आहे. उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक स्पर्धेचे संयोजक डॉ. श्रीरंग वराडपांडे यांनी केले. माया हाडे, श्रद्धा पाठक, सुरेश गुप्ता, रंजना गुप्ता, अभिजित मुळे, विश्वनाथ कुंभाळकर, भोलानाथ सहारे, वंदना कुलकर्णी, मोहन महाजन, अतुल सगुलले, लक्ष्मी राया, लता खापेकर, मनीषा दुबे, समृद्धी वराडपांडे, डॉ. अजय सारंगपुरे आदींनी आयोजनासाठी विशेष परीश्रम घेतले. अंतिम फेरीसाठी सहा विभागांतून प्रत्येकी दोन अशा एकूण १२ भजनी मंडळांची निवड होणार आहे.
आज पश्चिम विभागात
६ जानेवारी (शनिवार) : श्रीराम मंदिर,रामनगर