सध्या परीक्षेचा मौसम सुरू आहे. वर्ग दहावी व बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळया अभ्यासक्रमाच्या सामाईक परीक्षा सुद्धा सुरू आहे. जेईई, नीट सीईटी, परीक्षांपैकी काही परीक्षा संपल्या आहेत व निकाल यायला सुरुवात झालेली आहे.
निकाल लागल्यानंतर सर्व विद्यार्थी व पालकांची प्रवेशाकरीता कागदपत्रांची जुळवणी सुरु आहे. आरक्षणांतर्गत राखीव प्रवर्गात प्रवेश घ्यावयाचा असल्यास महत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे जात प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र होय. असे जात वैधता प्रमाणपत्र आपण प्राप्त केले नसेल तर प्रवेशाच्या वेळेपर्यत आपणाकडे वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास आपण आरक्षित प्रवर्गाचे असून सुध्दा आपल्या हक्कापासून वंचित राहू शकता. जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया काय आहे हे आपण समजून घेऊया
जात वैधता प्रमाणपत्राची गरज :-
जे विद्यार्थी १२ वी पास झाल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेणार असेल अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता आहे. बारावी विज्ञान शाखतील अभियांत्रिकी, वैद्यकीय, औषधोपचार, स्थापत्य, पशुवैद्यकिय,मत्स्य,विधी शाखा, बॅचलर ऑफ फाईन आर्ट अशा प्रकारे बारावीच्या आधारे ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यावयाचा आहे त्याकरिता जात वैधता प्रमाणपत्राची गरज आहे.
जात प्रमाणपत्र कुठे काढावे :-
राखीव प्रवर्गात असणा-या बहुतांश विद्यार्थ्याकडे जातीचे प्रमाणपत्र वर्ग दहावी पूर्वीच काढलेले असते परंतु त्याने जातीचे प्रमाणपत्र काढण्यापूर्वी काही गोष्टीची माहिती घेऊनच जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक असते.
जातीचे प्रमाणपत्र हे अर्जदाराच्या वाडवडीलांचे कायमस्वरुपी वास्तव्य एका निश्चित तारखेस ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणी काढणे आवश्यक आहे. उदा.अनुसूचित जाती प्रवर्गातील अर्जदार असल्यास १० ऑगष्ट १९५० पूर्वी अर्जदाराचे वाडवडील ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्याच ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे. अशाच प्रकारे इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गाकरीता १३ ऑक्टोबर १९६७, विमुक्त जाती व भटक्या जमाती साठी २१ नोव्हेबर १९६१ पूर्वी ज्या ठिकाणी वास्तव्य होते त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढणे आवश्यक आहे.
वरीलप्रमाणे अर्जदाराच्या वाडवडीलांचे वास्तव्य नसतांना सक्षम प्राधिका-याने (उपविभागीय अधिकारी) जातीचे प्रमाणपत्र दिल्यास ते जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीमार्फत अवैध ठरविले जाते. एखाद्या अर्जदाराने वाडवडील, शिक्षण, रोजगार निमित्त एखाद्या भागात मानीव दिनांकानंतर वास्तव्यास गेले असल्यास त्यांनी त्या ठिकाणी जातीचे प्रमाणपत्र काढू नये. त्यांचे मुळ वास्तव्याच्या ठिकाणी प्रमाणपत्र काढावे तेच प्रमाणपत्र ग्राह्य राहील.
जातीचे प्रमाणपत्र अचूक असावे :-
आपण जे जातीचे प्रमाणपत्र काढतो ते पुन्हा तपासून पहावे. स्वत:चे जातीचे प्रमाणपत्र शाळा सोडल्याच्या दाखल्यावर जे स्पेलींग आहे अथवा वर्ग १० वी च्या बोर्ड प्रमाणपत्रावरील स्पेलींगप्रमाणेच स्पेलींग असावे. तसेच प्रमाणपत्रावर रेव्हेन्यू क्रमांक नमुद असावा, प्रमाणपत्र निर्गमित दिनांक, जातीचे स्पेलींग व जातीचा प्रवर्ग अचूक आहे हे अर्जदारानेच पाहून घ्यावे. वरील बाबी अर्जदाराच्या प्रमाणपत्रामध्ये चुकीच्या असल्यास ज्या कार्यालयाकडून जातीचे प्रमाणपत्र प्राप्त केले आहे. त्या कार्यालयाकडून जातीचे प्रमाणपत्र दुरुस्ती करुन घ्यावे व त्याची पडताळणी करावी.