– आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्याचे मनपाचे आवाहन
नागपूर :- नागपूर शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाचा वाढता प्रसार रोखण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आरोग्य विभाग सज्ज आहे. आरोग्य विभागाद्वारे मनपाच्या दहाही झोन निहाय तापरुग्णांचे सर्वेक्षण केले जात असून, आतापर्यंत ६ लाख ४४ हजार ०४६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार झोननिहाय चमू कार्य करीत आहेत. घरी आणि परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा लारवा पाण्यात वाढत असल्यामुळे कुठेही पाणी जमा होऊ नये याची काळजी घ्यावी. कुलर, कुंड्या यातील पाणी दररोज बदलावे. याशिवाय ताप असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा, तसेच आठवड्यात एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असे आवाहन डॉ. चौधरी यांनी केले आहे.
सोमवारी (ता:२६) मनपा मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी लक्ष्मीनगर झोन कार्यालयाला भेट देत परिसराची पाहणी केली. यावेळी डेंग्यू व चिकनगुनिया नियंत्रणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपाय योजनेसह परिसराची नियमित स्वच्छता आणि धूर फवारणी यासंदर्भात माहिती जाणून घेतली. गोयल यांनी पाहणीची संपुर्ण माहिती मनपा आयुक्त यांना दिली.
याप्रसंगी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, झोनल वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कांबळे प्रामुख्याने उपस्थित होते.
या सर्वेक्षणामध्ये आशा स्वयंसेविका घरोघरी भेट देऊन तापरुग्णांची माहिती घेतात. याशिवाय कंटेनर सर्वेक्षण अंतर्गत घरात आणि परिसरात पाणी जमा राहणाऱ्या वस्तूंची पाहणी केली जात आहे. सोमवार २६ ऑगस्टपर्यंत मनपाच्या दहाही झोनमधील ६४४०४६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात १६७७ कुलर, ३५३८ टायर, १६९९३ कुंड्या, ८१७९ ड्रम, ३१७८ मडके, २७०३ पक्षी व प्राण्यांची भांडी आणि ५५९० इतर भांड्यांमध्ये डेंग्यूचा लारवा आढळून आला. लारवा आढळलेल्या ठिकाणी औषध टाकण्यात आले आहे.
घरी आणि परिसरात डेंग्यूच्या डासांची पैदास होऊ नये यासाठी नागरिकांनी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यूचा लारवा पाण्यात वाढत असल्यामुळे कुठेही पाणी जमा होऊ नये याची काळजी घ्यावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.