जपानचे वीस उपासक घेणार श्रामणेरची दीक्षा

– दीक्षाभूमीवर आजपासून धम्मदीक्षा सोहळा

– जपानचे चाळीस उपासक येणार  

नागपूर :- धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त पवित्र दीक्षाभूमी येथे तीन दिवसीय धम्मदीक्षेचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. 24 ऑक्टोबरपर्यंत चालणार्‍या या कार्यक्रमाचे उद्घाटन रविवारी (22 ऑक्टोबर) सकाळी 9.30 वाजता करण्यात येईल. दीक्षाभूमी येथे जपानचे 40 प्रतिनिधी येणार असून त्यापैकी 20 उपासक श्रामणेरची दीक्षा घेणार आहेत, अशी माहिती परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी दिली.

ससाई पुढे म्हणाले, दरवर्षीप्रमाणे धम्मदीक्षेचा सोहळा तीन दिवस आयोजित करण्यात आला आहे. देश-विदेशातील अनुयायी पवित्र दीक्षाभूमीवर येतात. त्यादृष्टीने धम्मदीक्षा आणि धम्म परिषद घेण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 9.30 वाजता भदंत ससाई बुद्धवंदना घेतल्यानंतर कार्यक्रमाला प्रारंभ होईल. यावेळी मंचावर भदंत धम्मसारथी, नागवंश, प्रज्ञा बोधी, भीमा बोधी, नागसेन, महानामा, राहुल, धम्मविजय, कश्यप, भदंत धम्मप्रकाश, संघप्रिया, विशाखा गौतमी, पुंडलिक उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटनानंतर भदंत ससाई उपस्थित बांधवांना दीक्षा देतील. यानंतर दिवसभर धम्मदीक्षेचा सोहळा सुरू राहील. समितीतर्फे भिक्खू संघाला भोजनदान देण्यात येईल. सोमवारी (23 ऑक्टोबर) सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान जपानचे 20 उपासक भदंत ससाई यांच्या हस्ते श्रामणेरची दीक्षा घेतील. या 20 उपासकांत महिला उपासिकांचाही समावेश आहे. थायलंडच्या भिक्खू संघातर्फे त्यांना भोजनादान दिले जाईल. तिसर्‍या दिवशी म्हणजे मंगळवारी (24 ऑक्टोबर) दिवसभर धम्मदीक्षा सोहळा होईल. या तीन दिवसांत हजारो बांधव धम्मदीक्षा घेतील, असा विश्वास भदंत ससाई यांनी व्यक्त केला.

सोमवारी धम्म परिषद

भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (23 ऑक्टोबर) सायंकाळी 7 वाजता धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेला उदोमधम्मकित्ती, डॉ. पेन सुनसवाड, राजेश बौद्ध, डॉ. उषा कुमारी, ज्ञानशील, अनिलकुमार, राहुल आनंद, के. संपत, ए. नत्थी प्रकासम, जी. पंडियान, डॉ. राजेंद्र अनागारिक, डॉ. ए. आर. श्रावणकुमार, डॉ. डी. आर. शेखर उपस्थित राहतील. जपान, थायलंड, मलेशिया आणि देश-विदेशातील बौद्ध भिक्खू प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन करतील. मंगळवारी (24 ऑक्टोबर) सकाळी 9 वाजता भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई सामूहिक बुद्ध वंदना आणि 22 प्रतिज्ञा देतील. यावेळी समता सैनिक दलातर्फे मानवंदना देण्यात येईल.

सम्राट अशोकाचा अष्टधातूचा पुतळा

बुद्धिस्ट फॅटर्निटी मुव्हमेंटचे डॉ. भारती प्रभू आणि डॉ. प्रशांत इंगोले यांच्या नेतृत्वात तामिलनाडू येथून रॅली निघाली. एका भव्य वाहनावर सम्राट अशोक यांचा अष्टधातूंचा पुतळा रविवारी नागपुरात येणार आहे, अष्टधातूचा पुतळा दीक्षाभूमीवर येईल, असेही ससाई यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते 'नॅब' येथे दृष्टिबाधित महिलांना स्वयंरोजगार किटचे वितरण

Mon Oct 23 , 2023
– दिव्यांगांनी एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करावी: राज्यपाल रमेश बैस मुंबई :- कृत्रिम प्रज्ञा व मशीन लर्निंगच्या आजच्या काळात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होत आहेत. परंतु, त्यासोबतच अनेक कौशल्ये कालबाह्य ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर दिव्यांग पुरुष व महिलांनी एकापेक्षा अधिक कौशल्ये आत्मसात करावी; स्वतःकडे असलेली कौशल्ये उन्नत करावी तसेच पारंपरिक कौशल्ये जोपासावी, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com