– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे आयोजन
नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव अंतर्गत रामटेक येथील ताई गोळवलकर महाविद्यालयात रेशीम शेती, मत्स्यपालन, मशरूम शेती, मधमाशी पालन केंद्र उद्घाटन सोहळा गुरुवार, दिनांक १४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पार पडला. रामटेक येथील ताई गोळवलकर महाविद्यालय आणि कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या पुढाकाराने ग्राम चलो अभियान अंतर्गत अशा प्रकारचे केंद्र प्रथमच सुरू करण्यात आले आहे.
कार्यक्रमाला मुख्य अतिथी व उद्घाटक म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, विशेष अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय तांत्रिक सल्लागार सीएसबीआर डॉ. सुरेश रैना, विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या सदस्या डॉ. कल्पना पांडे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव कक्ष अध्यक्ष डॉ. संतोष कसबेकर, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांची उपस्थिती होती.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. सुरेश रैना यांनी केंद्राद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कशा पद्धतीने आपला उद्योग वाढवता येईल. यात महाविद्यालयाची भूमिका काय राहील व विद्यापीठ कशा पद्धतीने त्यांना मदत करेल याबाबत माहिती दिली. आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या सदस्या डॉ. कल्पना पांडे यांनी रोजगार न मागता रोजगार देणारा विद्यार्थी कसा बनेल यात विद्यापीठाचा कौशल्य विभाग कशी मदत करू शकेल यावर मत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. त्याचप्रमाणे रोजगाराभिमुख अभ्यासक्रमाची गरज आणि उपलब्ध असलेल्या संधी या बाबत मार्गदर्शन केले. ताई गोळवलकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश शिंगरू यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.