नागपूर :- महावितरणतर्फ़े राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेचा अभ्यास करण्यासाठी कर्नाटक राज्याच्या ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिका-यांनी गुरुवारी (दि. 5 ऑक्टोबर) नागपूर जिल्ह्यातील विविध प्रकल्पांची पाहणी करुन माहिती घेतली. महाराष्ट्र शासनाच्या महावितरण मार्फ़त सुरु असलेल्या या योजनांची प्रशंसा करीत या योजना कर्नाटक राज्यात देखील राबविण्याचा मानस या अधिका-यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
या अभ्यास दौ-यात बंगलेरु वीज पुरवठा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक महंतेश बिलागी, कर्नाटक अक्षय ऊर्जा विकास मर्यादितचे व्यवस्थापकीय संचालक के.पी. रुद्रापैई आणि गुलबर्गा वीज पुरवठा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रविंद्र करीलिंगन्नवार यांचा समावेश असलेल्या या अभ्यास मंडळाने नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजने अंतर्गत 33 केव्ही खापरखेडा उपकेंद्रतील 2.5 मेगावॅट सौर कृषी वाहिनी प्रकल्प आणि कोराडी उपकेंद्राला भेट दिली, सोबतच कळमेशवर येथील बळवंत राऊत यांच्या शेतात मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत बसविण्यात आलेल्या सौर कृषी पंपाची पाहणी करित लाभार्थी शेतक-यांसोबत चर्चा केली. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेबद्दल समाधान व्यक्त करून महाराष्ट्र शासनाचे आभार मानून इतर शेतक-यांनीही सौर कृषी पंपाचा वापर करण्याचे आवाहन केले.
यावेळी महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी आणि नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी अभ्यास मंडळातील सदस्यांना नागपूर परिमंडलासंबंधित तांत्रीक माहिती सोबतच परिमंडलात सुरु असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहीनी योजना आणि मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतील प्रकल्पांची विस्तृत माहिती दिली. यावेळी नागपूर ग्रामीण मंडलचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक, सावनेर विभागाच्या कार्यकरी अभियंता दिपाली माडेलवार, नागपूर परिमंडलाचे कार्यकारी अभियंता समिर शेंद्रे, कार्यकारी अभियंता (चाचणी) योगेन्द्र निचत, उपकार्यकारी अभियंता (खापरखेडा) मंगेश कहाळे, उपकार्यकारी अभियंता (कळमेश्वर पंकज होनाडे, सहाय्यक अभियंता (महादुला) रुपेश खवसे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.