– मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान
नागपूर :- महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कायाकल्प पुरस्कार विजेत्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना मंगळवारी (ता.१२) सन्मानित करण्यात आले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या मार्गदर्शनात मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये मंगळवारी (ता.१२) छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या प्रतिनिधींना प्रमाणपत्र प्रदान करुन गौरविण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सरला लाड, हिवताप व हत्तीरोग अधिकारी डॉ. मंजूषा मठपती, शहर प्रमुख व्यवस्थापक डॉ. अश्विनी निकम, शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. राजेश बुरे, झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.शिल्पा जिचकार, डॉ. दीपांकर भिवगडे, डॉ. सुनील कांबळे, डॉ.ख्वाजा मोईनुद्दीन, पीएचयू अर्चना खाडे आदी उपस्थित होते.
राज्य सरकारच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या कायाकल्प पुरस्कार योजनेमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने प्रथम पुरस्कार प्राप्त केला. केंद्राला राज्य सरकारच्या वतीने २ लक्ष रुपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. याशिवाय इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने द्वितीय तर कपिल नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने तृतीय क्रमांक प्राप्त केला. दोन्ही विजेत्यांना अनुक्रमे १.५० लक्ष व १ लक्ष रुपये पुरस्कार राशी प्रदान करण्यात आली. याशिवाय नारा, शांतीनगर, फुटाळा, जगन्नाथ बुधवारी, जयताळा, बाबुलखेडा, डिप्टी सिग्नल, के.टी.नगर, मानेवाडा, चिंचभवन, शेंडे नगर, भालदारपुरा, पाचपावली, सोमलवाडा व बिडीपेठ या १५ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी व अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी या यशाबद्दल वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय आरोग्य अधिकारी तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या चमूचे विशेष अभिनंदन केले.
कायाकल्प योजने अंतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील तसेच महानगरपालिकेतील सरकारी रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र यांचा सहभाग असतो. महानगरपालिका स्तरावरील आरोग्य विभागाचे एक पथक अंतिम परीक्षण करते. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर यांच्या मार्गदर्शनात नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी कायाकल्प सूचीनुसार अंमलबजावणी केली. त्यानुसार आरोग्य केंद्रातील स्वच्छता, बाह्यरुग्ण विभाग, रुग्णांना बसण्याची व्यवस्था, पिण्याचे पाण्याची व्यवस्था, संस्थेची देखभाल,जैविक कचरा व्यवस्थापन, जंतू संसर्ग व्यवस्थापन इत्यादी सर्व बाबींवर मुल्यांकन करून गुणांकन करण्यात आले. यात नागपूर महानगरपालिकेच्या झिंगाबाई टाकळी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने सर्वाधिक ९८.३० टक्के गुण प्राप्त करून राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला. इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने ९७.९० टक्के गुणांसह उपविजेतेपद आणि कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राने ९४.६० टक्के गुणांसह तृतीय पुरस्कार प्राप्त केला. कायाकल्प पुरस्कारा संदर्भात मनपाचे शहर गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. राजेश बुरे यांनी सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना सर्व बाबींबाबत योग्य ते समन्वय व मार्गदर्शन दिले.