मानसिक सत्तेवर ज्ञान अज्ञान दोन्ही हुकूमत करू शकतात. चलतीची पावती कुणाकडे यावर ते अवलंबून आहे. ती चलती .., परंपरा .. पारंपरिक विचारधारणा अशीही असू शकते. यावळणाने एखाददा दिल्ली सत्तेचाही विचार व्हावा.
दिल्लीची देशसत्ता उत्तरप्रदेशातून जाते असे नेहमीच बोलले जाते. आपण ते ऐकतो. मानतोही. पण खरे ते वेगळेच असावे. ते शोधायला देशातील लोकसभानिहाय संख्याबळाकडे जावे लागेल. कदाचित तिथे ते सापडू शकेल.
ते संख्याबळ राज्यानुसार शोधावे लागेल.
आज याक्षणी राज्यनिहाय लोकसभा संख्याबळ उतरत्या क्रमाने पूढीलप्रमाणे आहे. उत्तरप्रदेश (८०), महाराष्ट्र (४८), पश्चिम बंगाल (४२), बिहार (४०), तामिळनाडू (३९), मध्यप्रदेश (२९), कर्नाटक (२८), गुजरात (२६), राजस्थान (२५), आंध्रप्रदेश (२५), ओरिसा (२१), केरळ (२०), तेलंगणा (१७), झारखंड (१४), आसाम (१४), पंजाब (१३), छत्तीसगढ (११), हरयाणा (१०).
या १८ राज्यांची लोकसभा सदस्यसंख्या ५०२ होते. एकूण लोकसभा सदस्यसंख्या ५४३ आहे. एकूण राज्ये २८ व ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. अर्थात उरलेले ४१ लोकसभा खासदार हे उर्वरित १८ राज्यातून (१० राज्ये व ८ केंद्रशासित) येतात. यातही दिल्ली (७), उत्तराखंड (५), जम्मूकाश्मीर (५), हिमाचल प्रदेश (४) व उरलेले १-२-३ अशी आकडेवारी आहे.
यावरून भारतीय राजकारणात वर उल्लेखित (उत्तरप्रदेश ते हरयाणा) या १८ राज्यांची राजकीय महत्ता व महत्व लक्षात घ्यावे.
म्हणजेच, देशाची सत्ता हातात घ्यायची असल्यास या १८ राज्यांचे रिंगण महत्त्वाचे ठरते. त्यातही पहिली पाच उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार व तामिळनाडू ही राज्ये खूप महत्वाची आहेत. सत्तेचा रस्ता जायचा असेल तर या पाच राज्यातून जातो. त्या गांभीर्याने या स्थितीकडे पहावे. ही पाच राज्ये राज्यासाठी तेव्हढीच केंद्रासाठी महत्वाची ठरतात. आजघडीला या पाचपैकी पश्चिम बंगाल व तामिळनाडू ही दोन राज्ये विरोधकाकडे आहेत. बिहार व महाराष्ट्र राज्यात भाजपपूरक मिश्रित सत्ता आहे. उत्तरप्रदेश तेव्हढा सरळसरळ भाजपकडे आहे.
कधीकाळी चारदा उत्तरप्रदेशची सत्ता बसपाकडे होती. म्हणजे भाजपकडे उत्तरप्रदेशची सत्ता असणे हे नव्याने आहे.
चारदाची सत्ताधीश बसपा आज उत्तरप्रदेशात शून्यवत दिसतेय. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत बसपाला केवळ एक जागा मिळाली. २०२४ च्या लोकसभेत एकही नाही. ४०३ च्या विधानसभेत व ८० च्या लोकसभेत यूपीमध्ये बसपाची ही दु:स्थिती ! दिल्ली सत्तेचा मार्ग उत्तरप्रदेशातून जातो याचे हे क्लेशदायक उदाहरण ठरावे.
तीच पीडा महाराष्ट्राने दिली. महाराष्ट्रात भाजप ‘मोठा भाऊ’ होणे हा ‘टर्निंग पाँइंट’ आहे. भयंकर याचे की सारे उघड्यावर घडले. आधी धाकातून सत्ता. नंतर सत्तेतून सत्ता. असा नवा प्रयोग महाराष्ट्रात घडला.
बिहारात लालूप्रसाद यादव यांचा करिश्मा अंधुक होणे सुन्न करते. तेजस्वीने वारसा घेतलाय. तो जोर लावतोय. त्याचवेळी समाजवादी संस्कारातील नितीशकुमार यांचे राजकीय वागणे पुढच्या पिढ्यांना अंधारात ढकलते. रामविलास पासवानांचा ‘दिवा’ भलताच उजेड पाडतोय.
उरले ते पश्चिम बंगाल व तामिळनाडू. दोन्ही खंब ठोकूनविरोधात उभे आहेत.
पश्चिम बंगालमध्ये आज तृणमुलची सत्ता आहे. १४ वर्षांपासून ममता बॅनर्जी मुख्यमंत्री आहेत. याआधी सीपीएम ची सत्ता होती. अद्याप भाजपला इथे सत्तास्पर्श झालेला नाही. पश्चिम बंगाल साम्यवादाचा गढ होता. ३० वर्षाच्या वर कम्युनिस्टांचेच राज्य होते. काम्रेड ज्योती बसू व बुध्ददेव भट्टाचार्य यांची आठवण यावी.
खरेतर नक्षलवादी चळवळ तिथलीच. चारू मुजुमदार व कानू संन्याल या चळवळीचे उदगाते होते. दोघेही हयात नाहीत. नक्षलबाडी हे तिथल्या एका गावाचे नाव. गाव तिथेच आहे. चळवळ इतरत्र गेली.
साम्यवादही सध्या निष्प्रभ दिसतो. कधीनव्हे यावेगाने पश्चिम बंगाल घंटानादकडे सरकतांना दिसतोय.
याचवेळी सर्वात जास्त हिंदू मंदिरे असलेले राज्य तामिळनाडू संघ भाजपला ‘नो एन्ट्री’ सांगतेय. तिथे द्रमुक अद्रमुक सत्ता फिरतेय. सध्या द्रमुकची सत्ता आहे. मुख्यमंत्री व पक्षप्रमुख एम के स्टालिन खमके आहेत. द्रविडी विचाराने पक्के आहेत. भाजप त्यांचेपूढे निराश दिसतेय.
नुकताच दिल्लीचा बोभाटा संपला. उत्तराखंड व जम्मूकाश्मीर यांचा गवगवा कायम सुरू असतो. तशी ही दोन्ही राज्ये संख्यानिहाय नगण्य आहेत. पण हिंदुत्वाच्या प्रचारार्थ दोन्ही राज्ये, तिथल्या घटना देशभर वापरल्या जातात. नुकताच उत्तराखंडने समान नागरी कायदा राज्यात लागू केला. पहिले राज्य असण्याची बोंब देशभर केली. हे चालायचेच. चालत राहील.
तरीही, खरी सल पहिल्या ‘पंच राज्यांची’च असते. सोबत जोडून १३ राज्यांचे रिंगण असते.
देशप्रमुख जग फिरतात. पण लक्ष इथेच असते. त्यांच्या मनातील देश निवडणुकीत आहे. कोणत्या सभेत कोणते चुरचुरीत वाक्य फेकावे .. वेळ द्यावा लागतो ! तसे, एकही मंत्रालय त्यांचेकडे नाही.
अंततः देशसत्ता या पंचराज्यातून , त्याचवेळी सोबतच्या रिंगणातून जाते हेच निदर्शनास येते. म्हणून ही पाच राज्ये (यूपी, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू) ‘पंचप्यारे’ आहेत. सारी रसद व ताकद इथेच झोकली जाते.
यासोबतच घंटानादचे ठोके .. इडीचे धोके .. सोबतीला खोके .. व्युहबाज डोके .. कसे नाकारायचे ?
– रणजित मेश्राम