नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या धंतोली झोन अंतर्गत येत असलेल्या गांधीसागर तलावामध्ये मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले असून त्यामुळे परिसरात डासांचा प्रादूर्भाव वाढला आहे. त्यामुळे तलावातील गवत काढण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन माजी नगरसेवक प्रमोद चिखले यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांना मंगळवारी (ता.१२) दिले.
शिष्टमंडळामध्ये अरुण गाडगे, मिथुन भोंदळे, राकेश गावंडे, नरेंद्र गौतम, शुभम काळे, हरीभाउ बोरकर, कल्पना सुर्वे, मनिषा जिचकार, विभा सावंत, संध्या अश्वले, निरजा पाटील यांचा समावेश होता.
गांधीसागर तलाव शहराच्या मध्यभागी असून तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. सौदर्यीकरणाच्या कार्यामध्ये तलावाचे खोलीकरण व आतील गाळ काढण्यात आला. त्यामुळे जमिन कोरडी होती. पावसाळा सुरु झाला आणि तलावामध्ये चार, पाच फूट उंचीचे गवत संपूर्ण तलावभर पसरलेले आहे. यापूर्वी या तलावामध्ये असे गवत नव्हते, सध्या गवतामुळे संपूर्ण परिसरामध्ये डेंगू, मलेरिया या साथीचा पादूर्भाव आढळून आलेला आहे.
तलावाच्या चारही बाजूंनी जॉगींग ट्रॅक असून सकाळी अनेक नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. या गवतामुळे डासांची पैदास वाढली असून होणारा ‘दुष्परिणाम टाळण्याकरीता व तलावाचे सौंदर्यीकरण कायम ठेवण्याकरीता हे गवत पूर्णत: समूळ काढण्याची आवश्यकता असून यासंबंधी त्वरीत निराकरण करण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक प्रमोद चिखले व परिसरातील नागरिकांनी आयुक्तांना केली.