महाराष्ट्रातील तीन साहित्य‍िकांना मराठी, संस्कृत आणि ऊर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीचा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांना मराठी, संस्कृत आणि उर्दू भाषेसाठी साहित्य अकादमीच्या प्रतिष्ठीत ‘युवा साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

येथील कमानी सभागृहात युवा साहित्यिक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्ध साहित्य‍िक ममता कालिया उपस्थित होते. कार्यक्रमात एकूण 24 भाषेसाठी ‘युवा साहित्यिकांना वर्ष 2022 चा’ साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील तीन युवा साहित्यिकांचा समावेश आहे.

मराठी भाषेसाठी युवा साहित्य‍िक पवन नालट यांना ‘मी संदर्भ पोखरतोय’ या काव्य संग्रहासाठी ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या साहित्यकृतीत मी संदर्भ पोखरतोय या शीर्षकातूनच बऱ्याच गोष्टी व्यक्त होत असल्याचे श्री नालट म्हणाले. मी म्हणजे सामान्य माणूस, मी चा संदर्भ समाजातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक या सर्व घटकांमध्ये जे अनिष्ट आहे त्याला पोखरण्याचे काम हा सामान्य माणूस करू शकतो. अशा आशयाच्या कविता या काव्य संग्रहात असल्‍याचे नालट म्हणाले.

नालट हे मूळचे अमरावतीचे असून ते शिक्षक आहेत. त्यांच्या याच कविता संग्रहाला के.बी. निकुंब काव्यसंग्रह पुरस्कार, विदर्भ साहित्य संघाचा नवोदित साहित्य लेखनाचा पुरस्कार तसेच डॉ. किसनराव पाटील वाड;मय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

‘श्रीमतीचरित्रम्’ या संस्कृत काव्य संग्रहासाठी श्रुती कानिटकर यांना पुरस्कार

मुंबईच्या श्रुती कानिटकर यांना त्यांच्या संस्कृत भाषेतील ‘श्रीमतीचरित्रम्’ या काव्यसंग्रहासाठी ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राधा-कृष्ण प्रेम हे सर्व परिचित आहे. कृष्णाबद्दल सर्वांना माहिती आहे. मात्र, राधाबद्दल कमी लोकांना माहिती असल्याचे श्रुती यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, राधा या चरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न या काव्य संग्रहात करण्यात आला आहे. हे काव्य सात विभागात आहे. प्रत्येक भागाला लीला असे नाव देण्यात आलेले आहे. यात प्रेम भक्ती व्यक्त करण्यात आली आहे.

श्रुती कानिटकर या आयआयटी मुंबईत सहायक प्राध्यापक आहेत. त्या वेदांतमध्ये पी.एच.डी करीत आहेत. श्रुती यांनी वयाच्या 11 वर्षापासून लेखनाला सुरूवात केली. त्यांच्या श्रीमतीचरित्रम् (कविता संग्रह), सुभाषित – रत्नभांडागारम् (मराठीतील अनुवादाला) श्रीपाद सेवा मंडळ काव्य लेखन स्पर्धेमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे.

गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना युवा साहित्य पुरस्कार

‘गिरयाह’ ग़ज़ल संग्रहासाठी मक़सूद आफ़ाक़ यांना वर्ष 2022 चा ‘युवा साहित्य’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांचा ग़ज़ल संग्रह सामाजिक संबंध, मानवीय मूल्य, श्रम आणि आधुनिक दुनियेतील भ्रम यावर आधारित आहे. हा संग्रह पारंपरिक आणि आधुनिक ग़ज़लांचे संयोजन आहे. जीवनातील चढ उतार ग़ज़लांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात आलेले आहेत.

मुंबईचे मकसूद आफाक हे शिक्षक आहेत. त्यांचे ऐतबार आणि गिरयाह हे दोन ग़ज़ल संग्रह आहेत. त्यांनी वेब सीरीजसाठी गीत लिहिले आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य साहित्य अकादमीच्या पुरस्कारानेही सन्मानित करण्‍यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बाळगंगा प्रकल्पग्रस्तांवरील खटले मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Thu Dec 29 , 2022
नागपूर : रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरण संघर्ष व पुनर्वसन समितीचे कार्यकर्ते आणि प्रकल्पग्रस्तावरील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तावरील गुन्हे मागे घेण्याच्या अनुषंगाने सदस्य शशिकांत शिंदे यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. याबाबत अधिक माहिती देतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, राजकीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights