नागपूर :- महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्या नव्याने (de-novo) तयार करण्यात येत असून विभागातून एकूण 32 हजार 696 अर्ज प्राप्त झालेले आहेत. अद्याप अर्ज न देऊ शकलेले पात्र शिक्षक 9 डिसेंबरपर्यंत अर्ज सादर करू शकतात, असे प्रशासनाने कळवले आहे.
नागपूर विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या सहा जिल्हयांचा समावेश आहे. या कार्यक्रमानुसार, 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत नमुना-19 चे अर्ज स्विकारण्यात आले होते. 1 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर 2022 या कालावधीत नागपूर विभागात नागपूर-11,003, वर्धा-4,200, भंडारा-3,534, गोंदिया-3,795, चंद्रपूर-7,194 व गडचिरोली-2,970 असे एकूण 32 हजार 696 अर्ज प्राप्त झालेले आहेत.
नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीच्या कार्यक्रमानुसार 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात येणार आहे. तसेच 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे. ज्या पात्र शिक्षकांनी मतदार म्हणून नोंदणीसाठी अर्ज केला नसेल, त्यांनी 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर 2022 या कालावधीत मतदार नोंदणीसाठी नमुना-19 मध्ये संबंधित क्षेत्रासाठी नेमून दिलेल्या पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावे असे उपायुक्त (सामान्य) यांनी कळविले आहे