नागपूर :- वारंवार आवाहन करूनही वीज बिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणला नाईलाजाने थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करावा लागला आहे. महावितरणचे प्रादेशिक संचालकापासून ते जनमित्र पर्यंत सर्वजण थकबाकी वसुलीसाठी थेट मैदानात उतरले असून थकबाकीदारांची वीज खंडीत करण्याची कारवाई यापुढील काळात आणखी तीव्र करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंतेच नव्हे तर तांत्रिक कर्मचा-यांसोबतच लेखा आणि मानव संसाधन विभागातील पुरुष आणि महिला कर्मचारी देखील या मोहीमेत सहभागी होत थकबाकीदार ग्राहकांपर्यंत जाऊन वीजबिल भरण्याचे आवाहन करीत आहेत, सोबतच वारंवार आवाहन करून देखील वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष करणा-या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करीत आहेत. थकबाकीदार ग्राहकांनी महावितरण मोबाईल ॲप किंवा ऑनलाईन पर्यायाचा वापर करून आपले वीजबिल त्वरीत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात येत आहे.
महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, नागपूर ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक, काटोल विभागाचे कार्यकारी अभियंता दिपक आघाव आणि त्यांच्या सहका-यांनी आज (दि. 28) काटोल परिसरातील वीज ग्राहकांकडील थकबाकी वसुली मोहीमेत सहभाग घेतला, तर सुटीच्या दिवशी मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंता सर्वश्री अमित परांजपे, राजेश नाईक यांच्यासोबत कार्यकारी अभियंता सर्वश्री राजेश घाटोळे, हेमराज ढोके, प्रफ़ुल्ल लांडे, राहुल जिवतोडे, समीर टेकाडे, रुपेश टेंभुर्णे, चंदन तल्लावार श्रीमती दिपाली माडेलवार यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी ग्राहकांसोबत संवाद साधून त्यांना थकबाकी भरण्याचे आवाहन केले.
थकीत वीज बिल असलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा कोणत्याही क्षणी खंडीत करण्याची मोहीम महावितरणकडून सुरु करण्यात आली आहे. मागील कांही दिवसांत अनेक ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी भरून, महावितरणला सहकार्य केले असले तरी टाळाटाळ करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. रक्कम कितीही असली तरी एका महिन्याचे वीज बिल थकल्यास नियमानुसार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने ग्राहकांनी आपल्याकडील थकबाकी वेळेत भरून होणारी कटू कारवाई टाळावी, असे महावितरणतर्फे आवाहन करण्यात आले आहे.