मनपाच्या ‘टॅक्स मॉनिटरिंग अॅप‘ संकल्पनेची निवड
नागपूर, ता. १९ : राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागातर्फे प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेमध्ये वाढ, लोकाभिमुखता व निर्णयक्षमता तसेच सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा” राबविण्यात आली होती. राज्य शासनातर्फे या स्पर्धेच्या पुरस्काराची घोषणा सोमवारी (ता. १८) करण्यात आली. यात राज्यातील महानगरपालिका गटातून नागपूर महानगरपालिकेच्या “टॅक्स मॉनिटरिंग अॅप” या संकल्पनेला द्वितीय पुरस्कार मिळाला आहे. मनपाला राज्य शासनाकडून रोख ६ लाख रुपये, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक देण्यात येणार आहे. यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. यांनी मालमत्ता कर विभाग, माहिती व तंत्रज्ञान विभाग आणि आपल्या संपूर्ण चमूचे अभिनंदन केले.
राज्य शासनातर्फे “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा” अंतर्गत २०२१-२२ साठी राज्यातील विविध कार्यालये, विभाग, महापालिका यांच्याकडून सर्वोत्कृष्ट कल्पना, उपक्रम यांचे प्रस्ताव मागविण्यात आलेले होते. स्पर्धेत नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री राधाकृष्णन बी. यांनी टॅक्स मॉनिटरिंग अॅपची संकल्पना मंडली. या माध्यमातून मनपाच्या कर संकलनामध्ये गतिशीलता आणून मालमत्ता निहाय सर्व अचूक माहिती त्वरित उपलब्ध होणार आहे.
महानगरपालिकेचे उपायुक्त (महसूल) श्री.मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की, मनपाच्या मालमत्ता कर विभागाचा ‘टॅक्स मॉनिटरिंग अॅप’ मुळे मालमत्ता कर विभागाच्या कार्यात पारदर्शकता व गतिमानता आलेली आहे.
त्यांनी सांगितले की, नागपूर महानगरपालिका द्वारा नागपूर क्षेत्रातील मालमत्तांचे जी.आय.एस. डाटा गोळा करण्याचे काम २०१६ पासून सुरु करण्यात आले. मनपा क्षेत्रातील ६,२७,८३३ मालमत्ताकरीता जी.आय.एस. डाटा गोळा करण्यात आलेला असून या डाटाचा मदतीने संबंधित मिळकतीचे अपेक्षीत मासीक भाडे, वार्षिक भाडे व कर योग्य मूल्य निश्चित करुन मालमत्ता कर आकारणी करण्यात येत आहे. शहरातील कोणत्या मालमत्ताचे मासिक भाडे, वार्षिक भाडे, कर कोणत्या दरांनी आकारण्यात आलेला आहे यासंबंधीची सर्व माहिती सिटीझन पोर्टलच्या माध्यमातून मालमत्ता धारकांना डिजिटल स्वरूपात उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
शहराचा दौरा करताना मनपाच्या अधिकाऱ्यांना ‘टॅक्स मॉनिटरिंग अॅप’ ची मदत होत असते. शंभर मीटरच्या Radial अंतरामधील मालमत्तांकरिता वास्तविक डाटाच्या आधारे मालमत्ता कर निर्धारण झालेले आहे किंवा नाही, करदात्याने कर कधी भरला, कोणत्या मिळकतीकरीता किती वर्षांपासून मालमत्ता कर थकीत आहे, त्याच वेळी करदात्याला मालमत्ता कर जमा करावयाचा असल्याचा कर संग्राहक संबंधित व्यक्तीकडून मालमत्ता कर जमा करून घेऊन शकतो, अशा प्रकारची सर्व माहिती मोक्यावरच अधिकाऱ्यांना प्राप्त होते. या सर्व बाबिंचा विचार करता ‘टॅक्स मॉनिटरिंग अॅप’ मुळे मनपा प्रशासनाच्या तसेच कर विभागाच्या कामात गतिशीलता आलेली असून काम पारदर्शक झालेले आहे.