पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन

– महाराष्ट्रात विमानसेवेचे जाळे निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न – देवेंद्र फडणवीस

– पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रयत्न – अजित पवार

पुणे :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोहगाव येथील पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे दुरदृष्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. या नव्या टर्मिनलमुळे देशातील सामान्य माणसासाठी विमान प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होईल, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला कोल्हापूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर पुणे विमानतळ येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.

पुणे शहराच्या संस्कृतीची अनुभूती करून देणारे भव्य, अत्याधुनिक टर्मिनल अस्तित्वात आल्याबद्दल केंद्र सरकारला धन्यवाद देऊन उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे हे एक महत्वाचे शहर आहे. पुणे जिल्हा महाराष्ट्राचे मॅन्युफॅक्चरिंग आणि आयटी हब आहे. देश-विदेशातून अनेक नागरिक पुण्यात येतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवाशांना सुविधा देण्यासाठी जुने टर्मिनल अपूरे होते. संरक्षण मंत्रालयाला विनंती करण्यात येऊन नव्या इमारतीसाठी जागा उपलब्ध झाली आणि त्यामुळे भव्य टर्मिनल उभे राहिले आहे.

महाराष्ट्राचे प्रेरणास्त्रोत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा इमारतीच्या बाहेर उभारण्यात आला आहे. श्री विठ्ठलाचे म्युरल, वारली कला, देशी खेळ मल्लखांब आदींचे दर्शन या इमारतीत घडते. आपल्या स्थानिक संस्कृतीला साजेसे वातावरण या इमारतीत आहे. तसेच या विमानतळावर स्थानिक उत्पादनांची विक्री करता येणार आहे. एक परिपूर्ण टर्मिनल आपल्याला मिळाले आहे. कोल्हापूरलादेखील मराठा साम्राज्याला साजेसे असे टर्मिनल उभे रहात आहे. महाराष्ट्रातही विमानतळाच्या धावपट्यांना विकसीत करून विमानतळांचे जाळे निर्माण करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न आहे, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

पुरंदर येथील विमानतळ व कार्गो सेंटरसाठी लवकरच भूसंपादन

पुणे वायुसेनेचे केंद्र असल्याने येथील धावपट्टी अनेकदा बंद ठेवावी लागते. त्यामुळे विमानसेवेच्या विस्ताराची गरज लक्षात घेता पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथे नवीन विमानतळ उभारण्यात येणार आहे. लवकरच त्यासाठीचे भूसंपादन प्रक्रीया सुरू करण्यात येणार आहे. उद्योगांना नवी पुरवठा साखळी विकसित करता येईल आणि रोजगाराला चालना मिळेल असे विमानतळ आणि कार्गो सेंटर पुरंदर येथे उभारण्यात येईल. पुण्याचा वाढता विस्तार लक्षात घेता हे विमानतळ आवश्यक असून त्यामुळे पुण्याच्या जीडीपीमध्ये २ टक्के वाढ होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विमानसेवा क्षेत्राने मोठी भरारी घेतली आहे. देशात गेल्या दहा वर्षात विमानतळांची संख्या दुप्पट झाली आहे. सामान्य माणसासाठी ‘उडान’ योजनेअंतर्गत हवाई वाहतूक उपलब्ध होत आहे. या विमानतळांचा उद्योगांना लाभ होऊन रोजगारांच्या संधी वाढत आहेत. दळणवळण सेवांच्या विस्तारामुळे उद्योगांनाही चालना मिळते आहे, असेही फडणवीस म्हणाले.

पुणे विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा प्रयत्न-अजित पवार

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, एकाचवेळी १० हजार कोटी रुपये खर्चाच्या १४ विमानतळ प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. बरेच दिवसापासून पुण्याच्या नावाला साजेसे टर्मिनल व्हावे ही पुणेकरांची मागणी होती. स्व.गिरीश बापट यांनी देखील नव्या टर्मिनल इमारतीच्या जागेसाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला. एक हजार मोटारी उभे राहू शकतील, ३४ चेक इन काऊंटर, ९० लाख वार्षिक प्रवासी क्षमता असलेले हे टर्मिनल आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारुढ पुतळा या परिसरात उभारण्यात आला आहे. एप्रिलमध्ये नव्या टर्मिनलच्या सुविधा सुरू करण्याच्या सुचना देण्यात आल्या असून पुणे जिल्ह्यात नवे विमानतळ उभारण्यासोबत विद्यमान धावपट्टी वाढविण्याचा विचार करण्यात येत आहे. दूरदृष्टी असणारे प्रधानमंत्री आपल्याला लाभल्यामुळे देशात आमुलाग्र बदल होत आहेत. वंदे भारत रेल्वे, नवे विमानतळ आदी बाबी पुर्णत्वास येत आहेत, असेही पवार म्हणाले.

डॉ. एच. श्रीनिवास यांनी प्रास्ताविकात पुणे विमानतळाच्या नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीतील सुविधांची माहिती दिली. भारतीय विमानतळांना आधुनिक सुविधा देण्यात येत आहे. विमानतळावर स्थानिक संस्कृतीला प्रदर्शित करण्यात येत आहे. पुणे विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीचे क्षेत्रफळ ५२ हजार चौ.मीटर असून सर्वाधिक व्यस्त वेळेत ३ हजार प्रवासी क्षमता आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाला खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, सुनील टिंगरे, सिद्धार्थ शिरोळे, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचे सह सचिव असंगबा चुबा, भारतीय विमान प्राधिकरणाच्या मानव संसाधन विभागाचे सदस्य डॉ. एच श्रीनिवास, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाचे पुणे विमानतळ व्यवस्थापक संतोष ढोके, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

युवक काँग्रेस कडून पोलिस भरतीच्या मागणीसाठी नागपूर ते नाशिक बाईक रॅली

Mon Mar 11 , 2024
नागपुर :- देवडिया काँग्रेस भवन येथे मा. नगरसेवक म.न.पा. व महासचिव राष्ट्रीय युवक काँग्रेस बंटी बाबा शेळके तर्फे नागपूर ते नाशिक बाईक रॅली संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. 14 मार्च ला नाशिक येथे पोलीस भरतीच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या मित्रांसह जननेते राहुल गांधी यांची भेट आणि सर्व मित्र भारत जोडो न्याय यात्रेत राहुलसोबत सामील होण्या करीता बाईक रॅली ने जात आहे.बाईक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights