पंतप्रधान उद्या 24 सप्टेंबर रोजी, 9 वंदे भारत गाड्यांना झेंडा दाखवून रवाना करणार

– या 9 वंदे भारत गाड्यांमुळे 11 राज्यांतील दळणवळणाला चालना मिळेल

– पुरी, मदुराई आणि तिरुपती यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना वंदे भारत गाड्यांची सुविधा देण्यात येणार

– या गाड्या त्या त्या मार्गावर धावणाऱ्या सर्वात वेगवान गाड्या असतील आणि त्यामुळे प्रवाशांच्या वेळेची लक्षणीय प्रमाणात बचत होईल

– या नव्या रेल्वे गाड्या प्रवाशांना जागतिक दर्जाच्या प्रवासाचा अनुभव देतील आणि त्यांच्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळेल

नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या 24 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी साडेबारा वाजता दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नऊ वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात येईल.

या नव्या वंदे भारत रेल्वे गाड्या म्हणजे देशभरातील दळणवळण व्यवस्था सुधारण्याबाबत तसेच रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत पंतप्रधानांनी मांडलेली संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दिशेने पुढे टाकलेले पाऊल आहे. उद्या रवाना होणाऱ्या नव्या रेल्वे गाड्या पुढीलप्रमाणे आहेत:

1) उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस

2) तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेस

3) हैदराबाद-बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेस

4) विजयवाडा-चेन्नई (रेनीगुंता मार्गे) वंदे भारत एक्स्प्रेस

5) पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस

6) कासारगोड-थिरूवनंतपुरम वंदे भारत एक्स्प्रेस

7) राऊरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस

8) रांची-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस

9) जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस

या नऊ रेल्वे गाड्यांमुळे, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरात अशा अकरा राज्यांतील दळणवळणाला चालना मिळणार आहे.

या वंदे भारत गाड्या, त्यांच्या निर्धारित मार्गांवर सध्या धावणाऱ्या गाड्यांपैकी सर्वात वेगवान रेल्वे गाड्या असतील आणि त्यांच्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या प्रवास वेळेची मोठी बचत होणार आहे. सध्या धावणाऱ्या सर्वात वेगवान गाड्यांशी तुलना करता, राऊरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस आणि कासारगोड-थिरूवनंतपुरम वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्या प्रवासाचा वेळ 3 तासांनी कमी करतील; हैदराबाद-बेंगळूरू वंदे भारत एक्स्प्रेसमुळे या प्रवासाचा अडीच तासांहून अधिक वेळ वाचेल; तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेस हा प्रवास दोन तासांहून अधिक काळ लवकर पूर्ण होईल; रांची-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस, पाटणा-हावडा वंदे भारत एक्स्प्रेस तसेच जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्स्प्रेस या गाड्या प्रवासाचा सुमारे 1 तास वाचवतील तर उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेसचा प्रवास नेहमीपेक्षा सुमारे अर्धा तास आधी पूर्ण होईल.

देशभरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांच्या ठिकाणची दळणवळण व्यवस्था सुधारण्यासंदर्भात पंतप्रधानांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार, राऊरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्स्प्रेस आणि तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेस या दोन रेल्वे गाड्या पुरी आणि मदुराई या अत्यंत महत्त्वाच्या धार्मिक शहरांना जोडणार आहेत. तसेच, विजयवाडा-चेन्नई वंदे भारत एक्स्प्रेस ही गाडी रेनीगुंता मार्गे धावेल आणि त्यामुळे तिरुपती तीर्थयात्रा केंद्रापर्यंत पोहोचण्याची सोय होईल.

या वंदे भारत रेल्वे गाड्यांमुळे देशातील रेल्वे सेवेची नवी मानके प्रस्थापित होतील. जागतिक दर्जाच्या सोयीसुविधा आणि कवच तंत्रज्ञानासह आधुनिक संरक्षक घटकांनी सुसज्जित असलेल्या या रेल्वेगाड्या म्हणजे सामान्य जनता, व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी समुदाय आणि पर्यटक यांच्यासाठी प्रवासाचा आधुनिक, वेगवान तसेच आरामदायी मार्ग उपलब्ध करून देण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आंतरराष्ट्रीय विधीज्ञ परिषद -2023 याचे नवीदिल्ली येथे पंतप्रधानांनी केले उदघाटन'

Sat Sep 23 , 2023
– “न्यायव्यवस्था आणि बार हे भारताच्या न्यायव्यवस्थेचे अनेक वर्षांपासूनचे संरक्षकआहेत” – “कायद्याच्या व्यवसायाने स्वतंत्र भारताचा पाया मजबूत करण्यासाठी कार्य केले आहे आणि आजच्या निःपक्षपाती न्याय व्यवस्थेमुळे विश्वाचा भारतावरील विश्वास वाढण्यास मदत झाली आहे” – “नारी शक्ती वंदन अधिनियम भारतातील महिलांच्या नेतृत्वाच्या विकासाला नवी दिशा आणि ऊर्जा देईल” – “जेव्हा जागतिक स्तरावर धोके निर्माण होतात, तेव्हा त्यांना सामोरे जाण्याचे मार्ग देखील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com