मुंबई :- अयोध्येतील मंदिरात बाल रूपातील श्री रामलल्ला विराजमान आहेत. तेथे सीतामाईंची मूर्ती का नाही अशी विचारणा करणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवारांनी आपला ढोंगीपणा दाखवून दिला आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील गटनेते आ. प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ. दरेकर बोलत होते. भाजपा प्रदेश मुख्यालय प्रभारी रवींद्र अनासपुरे, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते अभिषेक मिश्रा यावेळी उपस्थित होते.
आ. दरेकर म्हणाले की पवार साहेब आपण मंदिरात जात नाही, आपण धार्मिक नाही अशी शेखी मिरवत असता. धार्मिक नसलेल्या पवार यांना अयोध्येतील मंदिरात सीतेची मूर्ती का नाही याची चिंता लागावी, हे आश्चर्यजनक आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याचा स्वभाव असल्याने त्यांच्याकडून अशी विधाने केली जात आहेत. राम मंदिर निर्मिती नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. हे पाहून हतबल झालेल्या पवारांनी अशा कुरापती काढणे सुरु केले आहे. आपल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवणाऱ्या पवारांना सीता माईचा कळवळा येतो, यातून त्यांना आलेले नैराश्यच दिसते आहे. राम मंदिरातील मूर्ती बालरूपातील रामलल्ला आहेत, हे माहित नसल्याने पवारांनी अशी वक्तव्ये केली आहेत.
रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघातून उबाठा गटाने कितीही बढाया मारल्या तरी भाजपा महायुतीचे उमेदवार नारायण राणे हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास आ. दरेकर यांनी व्यक्त केला. यावेळी आ. दरेकर यांनी विनायक राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. राऊत यांनी 10 वर्षे खासदार असताना कोकणासाठी काय केले,याचा हिशोब द्यावा, असेही ते म्हणाले. आघाडीत तीन पक्ष असल्याने जागावाटपाला थोडा वेळ लागणारच. प्रत्येकाला आपल्याला अधिक जागा मिळाव्यात असं वाटण साहजिकच आहे. आम्हा सर्वांचे लक्ष्य नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचे असल्याने जागावाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माढा लोकसभा मतदार संघात कोणी कितीही दावे केले तरी भाजपा महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास आ. दरेकर यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, धैर्यशील मोहिते पाटील पक्षातून बाहेर पडले असले तरी त्याचा काही परिणाम पक्षावर होणार नाही. माढा मतदारसंघात मोहिते – पाटील यांचे पूर्वीसारखे वर्चस्व राहिलेले नाही असेही आ. दरेकर म्हणाले. उमेदवार निवडताना महायुतीतील तीन पक्ष जिंकून येण्याचा निकष लावतात. या निकषावरच भाजपा ला रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघ मिळाला आहे, असेही आ. दरेकर यांनी स्पष्ट केले .