नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या लोकप्रशासन आणि स्थानिक स्वराज्य शासन विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानव्यविद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी,विभागप्रमुख डॉ. जितेंद्र वासनिक आणि राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विकास जांभूळकर विशेष अतिथी म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
महिला दिन हा एक दिवस साजरा करण्याची बाब नसून क्षणोक्षणी महिला उन्नतीसाठी विधायक कृती करण्याचा संकल्प आपण यानिमित्त करायला हवा असे डॉ. जितेंद्र वासनिक यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा उल्लेख करत आपले प्रास्ताविक मांडले.
आंचल गोयल यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी केलेल्या उद्बोधनात लोकप्रशासनाचा अभ्यास प्रत्यक्षात शासनस्तरावर काम करताना त्यालील आदेशाची एकता आणि प्राधिकारा सोबत जबाबदारी या संकल्पनाचा मनव्याविद्याशाखेसोबतचा संबंध अधोरेखित केला. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यातील समन्वय हा सुशासनाला बळ देणारा असतो ज्याने लोकहित साधले जाते असे त्यांनी पुढे नमूद केले. आपण मूलभूत अधिकारांबाबत बोलण्याआधी आपली मूलभूत कर्तव्ये पार पाडायला हवीत असे दैनंदिन जीवनातील उदाहरणे देत महिलांसाठी सुरक्षित आणि सक्षम वातावरण निर्माण करावे अशी साद उपस्थितांना घातली.
महिला दिनानिमित्त महिलांच्या समस्यांना मांडून त्यांच्याबद्दलचा दुजाभाव दुर्दैवाने संपलेला नाही अशी खंत डॉ. विकास जांभूळकर यांनी व्यक्त केली. समभागी वृत्तीची जोपासना आणि अंमलबजावणी हे स्त्री सक्षमीकरणाचे भविष्य आहे असे आश्वासक प्रतिपादन त्यांनी केले. महिलांची सर्व क्षेत्रात होत असलेली प्रगतीची वाटचाल समृद्ध करण्यासाठी सर्वांनी यथाशक्ती प्रयत्न करायला हवेत असे मत डॉ. शामराव कोरेटी यांनी मांडले.
चर्चासत्रात कळमेश्वरच्या गटविकास अधिकारी अंशुजा गराटे आणि नागपूरच्या सहाय्यक पोलिस आयुक्त माधुरी बाविस्कर यांनी उपस्थितांसोबत संवाद साधला.स्त्रीने स्वभाव आणि स्वरूप ओळखून सकारात्मक दृष्टिकोन ठेऊन स्वावलंबी बनावे हे विचार स्वतःला घडवतांना उपयुक्त ठरले असे अपल्या व्यक्तव्यात अंशुजा गराटे यांनी मांडले. पोलीस यंत्रणेत कायदा व सुव्यवस्था राखतांना कोणताही दुजाभाव स्त्री म्हणून आमच्यासोबत होत नाही असे मत माधुरी बाविस्कर यांनी आपला सेवाकाळातील अनुभव कथन करताना व्यक्त केले. उपस्थितांच्या विषयानुरूप प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. यानिमित्त डॉ. सुप्रिया डेव्हिड यांनी आपल्या भाषणात महिला अधिकारी प्रशासनकार्यात निश्चित समर्थ आहेत असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
सूत्रसंचालन लिंटा टॉमसन आणि वर्षा चौधरी यांनी केले. आभार प्रदर्शन जूही मिश्रा आणि दीपा बोंबार्डे यांनी केले. विभागातील शिक्षक अंकुश मराठे यांच्या यशस्वी आयोजनाला संशोधक महेश लाडे शिक्षक रमण शिवणकर, श्रीवर्धन केकतपुरे आणि शिक्षतेतर कर्मचारी संदीप बोरकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.