यवतमाळ :- जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान युवकांना करिअर मार्गदर्शन करण्यात आले.
करिअर मार्गदर्शन शिबिराला प्रमुख मार्गदर्शक टीडब्ल्यूजे असोसिएशनचे सुरज मडगुलवार यांनी त्यांच्या कंपनी विषयी तसेच युवकांनी करिअर घडवत असताना योग्य निर्णय घेणे तसेच आपल्यामध्ये कौशल्याची जोड देऊन स्वत:ला अपडेट करणे, करिअर योग्य पद्धतीने निवडावे इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.
युवकांसाठी कौशल्य विभागाच्या विविध योजना या विषयी सहायक आयुक्त विद्या सा. शितोळे यांनी कौशल्य विभागाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना इत्यादी योजनेबाबत उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केले.
युवकांना डेअरी टेक्नोलॉजी आणि प्रक्रिया उद्योग या क्षेत्रात करिअरची संधी याविषयी युट्युब लाईव्ह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कॉलेज ऑफ डेअरी टेक्नॅालॉजीचे सहायक अधिष्ठाता डॉ.प्रशांत वासनिक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित 120 उमेदवारांना दुधावर प्रक्रिया करून विविध पदार्थ बनविणे व उद्योगाला पंचसूत्री नियमाने चालना देणे, दुध व्यवसायात आवड असणाऱ्या युवकांनी उद्योग उभारणे इत्यादी बाबत मार्गदर्शन केले. यावेळी प्राध्यापक डॉ.गजानन नारनवरे उपस्थित होते. सहायक आयुक्त विद्या शितोळे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यवतमाळ यांच्यावतीने सहायक आयुक्त विद्या शितोळे व सर्व कार्यालीन कर्मचारी यांनी जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्य वृक्षारोपण केले. यावेळी ग्रंथालयातील विद्यार्थी उपस्थित होते. आजच्या तरुणांची दिशा आणि स्थिती या विषयी निबंध स्पर्धेचे आयोजन ग्रंथालयातील उमेदवारांकरिता करण्यात आले होते. यामध्ये सहभागी उमेदवारांपैकी 2 विजेते निवडून पारितोषिकांचे वितरण करण्यात आले व उर्वरित सहभागी उमेदवारांना प्रोत्साहनपर पारितोषिक देण्यात आले.