नैरोबी येथे बॉयलर वर्ल्ड 2023 प्रदर्शनाचे उद्घाटन

– केनियाला भारताकडून स्वस्त दरात बाष्पकांचा पुरवठा शक्य

– कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे

मुंबई :- “बाष्पके क्षेत्रामध्ये भारतातील बाष्पके ही आरबीआय कोडनुसार बनवली जातात. ही बनवताना अनेक अभियंते आणि कुशल कामगार आपले कौशल्य वापरतात. त्यामुळे केनियाने आयबीआर कोड स्वीकारल्यास भारत कमित कमी खर्चात बॉयलर पुरवू शकतो. तसेच केनियातील या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना भारताप्रमाणे पायाभूत प्रशिक्षण दिल्यास रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होऊन केनियाचा सर्वांगिण आर्थिक व औद्योगिक विकास साधता येईल”, असे प्रतिपादन कामगारमंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी केनियातील नैरोबी येथे आयोजित ‘बॉयलर वर्ल्ड 2023’ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

ऑरेंज बिक टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी द रिपब्लिक ऑफ केनियाचे कामगार व सामाजिक संरक्षण कॅबिनेट सचिव फ्लोरेन्स बोर, केनियाच्या राज्य उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ.जुमा मखवाणा, केनियातील भारताचे उच्चायुक्त (हाय कमिशन) नामग्या खांपा, ऑरेंज बिक टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लि.चे व्यवस्थापकीय संचालक भानू राजगोपालन, महाराष्ट्र बॉयलर्सचे संचालक धवल अंतापूरकर उपस्थित होते.

सर्व बॉयलर उत्पादक आणि बॉयलर वापरकर्त्यांना व्यावसायिक व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी केनियाचे आभार मानले. केनियाचे कौतुक करताना मंत्री डॉ. खाडे म्हणाले, केनिया हा एकमेव विकसनशील देश आहे ज्यामध्ये युनायटेड नेशन संस्थेचे मुख्यालय आहे. भारत व केनियाचे विशिष्ट नाते आहे. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात हजारो भारतीयांनी रेल्वेची पायाभूत सुविधा बांधण्यासाठी केनियामध्ये आपले योगदान दिले. आज लाखो भारतीय केनियाच्या आर्थिक, सामाजिक, औद्योगिक, कामगार, दळणवळण, आरोग्य, पर्यटन अशा अनेक क्षेत्रांमध्ये केनियाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहेत.

उद्योग क्षेत्रातील जीवन आणि मालमत्तेचे धोक्यांपासून संरक्षण आणि उचित सुरक्षा उपायांचे पालन म्हणजेच औद्योगिक सुरक्षितता होय. यासाठी औद्योगिक नियमांमध्ये भारत सरकारने अनेक बदल केले आहेत. भारत १५३ वर्षांपासून जागतिक स्तरावर बॉयलर क्षेत्रामध्ये सर्वांना मार्गदर्शन करत आहे. भारतात बॉयलरच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन आयबीआर कोड अंतर्गत अतिशय कडक तपासणी प्रणालीद्वारे बॉयलर बनवले जातात. भारतात बनवलेले बॉयलर दर्जेदार असून आंतरराष्ट्रीय मानक व सुरक्षिततेनुसार अधिक कार्यक्षम असल्याचे मी विश्वासाने सांगू शकतो. भारतात वापरल्या जाणाऱ्या प्रणालीला जागतिक मान्यता मिळाली आहे.

उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेसोबतच जबाबदार अभियांत्रिकी आणि पर्यावरण संरक्षणाचे उद्दिष्ट राखले पाहिजे. जगाला हवामान बदलासारख्या जटिल आव्हानांचा सामना करावा लागत आहे. बॉयलर तज्ञ म्हणून नवीन उपाय शोधण्यासाठी आपल्याला आपले कार्य करावे लागेल. स्वच्छ ऊर्जा, प्रगत साहित्य आणि उच्च कार्यक्षमता असलेली नाविन्यपूर्ण उत्पादने आपली भविष्यातील गरज आहे.

सुरक्षिततेचे महत्व लक्षात घेता बॉयलरचे सुरक्षित ऑपरेशन आणि योग्य देखभाल जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षेसाठी आवश्यक आहे. उच्च सुरक्षा मानकांचे पालन करण्यात आणि बॉयलर फिल्डमध्ये सुरक्षिततेची संस्कृती वाढविण्यात आपण सर्वांनीच नेहमीच आघाडीवर असले पाहिजे असेही मंत्री डॉ. खाडे म्हणाले.

संपूर्ण जगात भारताच्या कार्य कुशल मनुष्यबळाची मागणी आहे. मानवी भांडवलाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि मुबलक उपलब्धता करण्यासाठी केनिया सरकारने एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे विनंती डॉ. खाडे यांनी केली.

जागतिक बँकेच्या ‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ च्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारताने जगात ६३ व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. केनिया इन्व्हेस्टमेंट ऑथॉरिटीनुसार भारत हा केनियातील दुसरा सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे. ६० पेक्षा अधिक मोठ्या भारतीय कंपन्यांनी उत्पादन, रियल इस्टेट (स्थावर मालमत्ता), औषधोत्पादन, दूरसंचार, आयटी, बँकिंग आणि कृषी आधारित उद्योगासह विविध क्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली आहे. भारतीय गुंतवणुकीमुळे केनियन नागरिकांना हजारो थेट नोकऱ्या निर्माण झाल्या असल्याचे मंत्री डॉ. खाडे यांनी याप्रसंगी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन

Fri Aug 11 , 2023
सावनेर :- मेरी माटी मेरा देश या देशपातळीवरील अभियानाचा भाग म्हणून लायन्स क्लब आणि पोलीस स्टेशन सावनेर यांचे संयुक्त विद्यमाने कान -नाक -घसा व नेत्र तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन पोलीस स्टेशन सभागृहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पोलीस निरीक्षक रवींद्र मानकर यांनी भूषविले तर डॉ. शिवम पुण्यानी प्रमुख वक्ते, प्रा. विलास डोईफोडे अध्यक्ष लायन्स क्लब विशेष करून उपस्थित होते. या प्रसंगी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!