राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो’ चे 24 ते 26 मार्च दरम्यान शिर्डी येथे आयोजन – पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई :- देशाच्या विविध राज्यातील पशुधनांच्या शंभराहून जातींचा सहभाग, पशुसंवर्धनासह कृषी, दुग्ध आणि मत्स्यव्यवसायासंबंधींचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील संस्थांचा आणि तज्ज्ञांचा सहभाग, देशी गोवंश संवर्धनासाठी नामवंत जातिवंत जनावरांसाठी बक्षिसे अशी वैशिष्ट्ये असणारे राष्ट्रीय पातळीवरील महापशुधन एक्पो-2023 हे शिर्डी येथे 24 ते 26 मार्च, 2023 या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.            विधानभवनातील समिती कक्षात आज मंत्री विखे पाटील यांनी महापशुधन एक्पो-2023 च्या अनुषंगाने नियोजन बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी. गुप्ता, सहसचिव माणिक गुट्टे, अतिरिक्त आयुक्त डॉ. शीतलकुमार मुकणे यावेळी उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, कृषी आयुक्त सुनिल चव्हाण यांच्यासह विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पशुसंवर्धन उपायुक्त, कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, पशुधन विकास मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ आदी विभागांचे अधिकारी सहभागी झाले होते.

शिर्डी येथे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने देशातील हे सर्वात मोठे राष्ट्रीय स्तरावरील ‘महापशुधन एक्सपो २०२३’ चे आयोजन करण्यात येणार आहे. देशातील 13 राज्यातील पशुपक्षी सहभागी व्हावेत असा प्रयत्न आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून देशी गोवंश संवर्धनाचे महत्त्व पटवून देवून देशी गोवंशामध्ये अनुवंशिक सुधारणा घडवून आणणे, सुशिक्षित बेरोजगारांना पशुपालनाद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यायोगे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करणे, दूध, मांस, अंडी उत्पादनास चालना देणे, जनावारांची उत्पादन क्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करणे, वैरण उत्पादनास चालना देणे, मुरघास हायड्रोपोनिक अझोला तंत्रज्ञान यासारख्या विषयांबाबत पशुपालकांना प्रात्यक्षिकांसह या प्रदर्शनात तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती, मंत्री विखे-पाटील यांनी दिली.

शिर्डी येथे सुमारे 46 एकरच्या विस्तीर्ण परिसरात हे महापशुधन एक्पो आयोजित करण्यात येणार आहे. पशुधनासाठी 450 स्टॉल्स, बचतगटासाठी 60 स्टॉल्स, पशुसंवर्धन विषयक 100 स्टॉल्स आणि पशुसंवर्धन, कृषि विषयक बाबींच्या व्यावसायिकांसाठी 100 स्टॉल्स याठिकाणी असणार आहेत. शेतकऱ्यांसाठी शास्त्रोक्त पध्दतीने पशुपालन करण्यासाठी आवश्यक यंत्रे उपकरणे तसेच पशुसंवर्धनाशी निगडीत बाबीसाठीच्या उत्पादनांच्या स्टॉल्सचा यामध्ये सहभाग असणार आहे. तसेच 65 प्रकारच्या विविध पशुपक्ष्यांच्या जाती या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. नागपूर येथील महाराष्ट्र पशु विज्ञान व मत्स्य विज्ञान विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा यामध्ये सक्रीय सहभाग राहाणार असून या प्रदर्शनाच्या निमित्ताने पाच लाख शेतकऱ्यांचा सहभाग या प्रदर्शनात राहील, अशी माहितीही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

‘महापशुधन एक्स्पो ‘ मध्ये राज्यातील शेतकरी आणि आणि पशुपालकांचा अधिकाधिक सहभाग राहील यासाठी प्रत्येक जिल्ह्याने नियोजन करावे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र स्टॉल्स देण्यात येणार असून त्या ठिकाणी संबंधित जिल्ह्यांनी त्यांची वैशिष्ट्ये असणारी माहिती, प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांसाठी प्रकाशित करावी, अशा सूचना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आरे दुग्ध वसाहतीमधील आदिवासी बांधवांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Sat Mar 11 , 2023
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील आरे दुग्ध वसाहतीत राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यावर लवकरच तोडगा काढला जाईल, असे राज्याचे महसूल तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. धरणे आंदोलन करणाऱ्या आदिवासी बांधवांच्या शिष्टमंडळाची आज त्यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मुंबई उपनगर जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या वतीने आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू आहे. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!