– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध कामांचे लोकार्पण व भूमिपूजन
नागपूर :- अपारंपारिक स्त्रोत व ग्रीन एनर्जीवर आधारित वाहतूक व्यवस्था उभारणारे नागपूर शहर हे देशातले पहिले शहर व्हावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर महानगरपालिकेच्या वतीने “दक्षिण-पश्चिम नागपूर व पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ येथील सिमेंट काँक्रीट रस्ते, सोनेगांव तलावाचे सौंदर्यीकरण व ई-बसेसचे तसेच विविध आयुष्मान आरोग्य मंदिराचे लोकार्पण व भूमिपूजन” शुक्रवारी(ता.८) करण्यात आले.
राजे संभाजी चौक(नागोबा मंदिर चौक) आय.टी. पार्क, मेन रोड येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात आमदार सर्वश्री प्रविण दटके, विकास ठाकरे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, माजी आमदार नाना शामकुले, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी, मनपा अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, जितेंद्र (बंटी)कुकडे, माजी महापौर संदीप जोशी, अनिल सोले यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर शहर हे आज जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर म्हणून नाव लौकिक मिळवीत आहे. राज्य शासन महिला सक्षमीकणासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहे. राज्य सरकारने महिलांसाठीचे धोरण अंमलात आणले आहे. त्यानुसार आता आईच्या नावाला देखील तितकेच महत्त्व दिले गेले आहे. मी देखील आता देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस असे नाव लावणार आहे. तसेच ग्रींन सिटी असणाऱ्या नागपूर शहरला डिझेल आणि पेट्रोल सारख्या पारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापरवापासून थांबविण्याचा मानस आहे. शहरात चालणाऱ्या आपली बसेसला ई बसेस वर घेत अपारंपारिक स्त्रोत व ग्रीन एनर्जीवर आधारित वाहतूक व्यवस्था उभारणारे नागपूर शहर हे देशातले पहिले शहर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, नागपूर शहर बदलत आहे शहराचा चौफेर विकास होत असून, सर्वांगीण विकासासाठी नागपूरला देशातील प्रथम क्रमांकाचे शहर म्हणून ओळखले जावे यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शहरातील तलावांचे सौंदर्यीकरण होत असून ऑक्सिजन पार्क आणि पर्यटनासाठी उत्तम असे तलाव शहरभर निर्माण होत आहेत अशाच सोनेगाव तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाचे लोकार्पण करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करित मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी सांगितले की, दक्षिण-पश्चिम नागपूर आणि पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये एकूण ५५२ कोटी ९३ लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. नागरिकांना मुलभूत सुविधा प्रदान करणे हे महानगरपालिकेचे कर्तव्य आहे.
यावेळी सिमेंट रस्ते, ऑरेंज सिटी स्ट्रीट प्रकल्पातील वाणिज्य आणि रहिवासी संकुल, गोरेवाडा व प्रतापनगर जलकुंभ, सार्वजनिक स्मार्ट टॉयलेट, व्हर्टिकल गार्डन , ई- बसेस, आरोग्य मंदिर, ग्लो गार्डन,, अहिल्याबाई होळकर सभागृह, छत्रपती शाहू महाराज रिसर्च इन्स्टिट्यूट, पंडित दीनदयाल उपाध्याय व राष्ट्रमाता कस्तुरबा ग्रंथालयांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमात मनपाच्या जागेवरील भाडेपट्टा पंजीबध्द झालेल्या झोपडीधारकांना पट्टे वाटप करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यावर माल्यापर्ण करण्यात आले. नागपुरातील महिलांसाठी मान्यवरांच्या हस्ते ”हॅलो यशस्विनी”9545759966 हेल्पलाईनचे लोकार्पण करण्यात आले. . महिलांसाठी शिक्षण आरोग्य रोजगार न्याय आणि कायदा याकरिता ही हेल्पलाईन मदत करेल.
मनपाचे उपायुक्त निर्भय जैन, उपायुक्त रवींद्र भेलावे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता लीना उपाध्ये, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदाडे, सुनील उइके, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी विजय जोशी, माजी नगरसेविका प्रगती पाटील, गोपाल बोहरे, पल्लवी शामकुळे, रीतेश वानखेडे, स्वप्नील लोखंडे आदी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी तर आभार जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी व्यक्त केले.