– लवकरच तयार होणार डीपीआर : अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची सफाई कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींशी बैठक
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेमध्ये कार्यरत सफाई कर्मचा-यांकरिता श्रम साफल्य योजनेंतर्गत मनपातर्फे सदनिका बांधण्यात येणार आहेत. मौजा नारी येथील जागा यासाठी निश्चित करण्यात आलेली असून येत्या काही महिन्यांत यासंदर्भातील सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य शासनाला सादर केला जाईल, अशी माहिती मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी सफाई कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत दिली.
राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी.पी. वावा यांच्याकडून प्राप्त निर्देशाच्या अनुषंगाने सफाई कर्मचा-यांच्या विविध समस्यांसंदर्भात मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील अतिरिक्त आयुक्तांच्या कक्षात मंगळवारी (ता.६) बैठक घेण्यात आली. अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या अध्यक्षतेते झालेल्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गजेंद्र महल्ले, सफाई कर्मचारी संघटनेचे उमेश पिंपरे (राष्ट्रीय अध्यक्ष्), राजेश हाथिबेड, मोतीलाल जनवारे, अरुण तुर्केल, शशी सारवान, सुनिल तुर्केल, रामसिंग अडबडिया, सुनिल समुद्रे, राजेंद्र हजारे, सुरज खरे आदी प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत सफाई कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींनी विविध समस्या मांडल्या. संघटनेच्या सर्व समस्या जाणून घेत त्यावर सकारात्मकदृष्ट्या अनेक महत्वाचे निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आले. श्रम साफल्य योजने अंतर्गत सफाई कर्मचा-यांकरिता सदनिका उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी संघटनेमार्फत करण्यात आली. यावर सकारात्मक प्रतिसाद देत मनपाद्वारे सदनिकांचे बांधकाम करण्याबाबत कार्यवाही सुरू झाल्याची माहिती अतिरिक्त आयुक्तांनी दिली. लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कर्मचा-यांच्या वारसांना नोकरीसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी यावेळी संघटनेमार्फत करण्यात आली. नागपूर महानगरपालिकेद्वारे १३५ सफाई कर्मचा-यांच्या वारसांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या सर्व कर्मचा-यांच्या वारसांना नोकरीकरिता जात पडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य आहे. यासाठी मनपाने पुढाकार घेत जात पडताळणी विभागाशी पत्रव्यवहार करून सदर वारसांना तातडीने जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याबाबत सूचना केली असल्याचेही अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी बैठकीमध्ये सांगितले.
कोव्हिडमुळे मृत कर्मचा-यांच्या कुटुंबाला मनपातर्फे १० लाख रुपये सानुग्राह मदत
कोव्हिड या जागतिक महामारीमुळे मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कर्मचा-यांच्या कुटुंबियांना नागपूर महानगरपालिकेतर्फे १० लाख रुपये सानुग्राह मदत देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोव्हिड विषाणूमुळे मुत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना ५० लाख रुपये मदत देण्याची घोषणा शासनाद्वारे करण्यात आली होती. सदर मदत प्रलंबित असल्यामुळे मनपाच्या सफाई कर्मचा-यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी १० लाख रुपये सानुग्राह मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार कोव्हिडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या सफाई कर्मचा-यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये सानुग्राह दिले जाईल.