– मुख्यकार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा यांचे हस्ते अभियानाचा शुभारंभ
– शुभारंभासाठी नागपुर जिल्ह्यातील ग्रा.पं. शितलवाडी ची निवड
– ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान चालणार अभियान
रामटेक :- ‘ मेरी मिट्टी मेरा देश ‘ अभियानाची सुरुवात दिनांक ९ ऑगस्ट पासून झालेली असून मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा यांनी या अभियानाच्या शुभारंभासाठी नागपूर जिल्ह्यातील रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणारी ग्रामपंचायत शितलवाडी ला निवडले. दिनांक ९ ऑगस्टला मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा यांनी सकाळी 11 वाजता दरम्यान येथे सदर अभियानाचा शुभारंभ केला. यावेळी येथे विविध उपक्रम राबविण्यात आले.
ग्रामपंचायत शितलवाडीचे ग्रामविकास अधिकारी ए. टी. गिरमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार हे अभियान ९ ते १५ ऑगस्ट पर्यंत राबवायचे आहे. त्यानुसार दिनांक नऊ ऑगस्टला सकाळी ११ वाजता दरम्यान येथे सदर अभियानाच्या शुभारंभाची जय्यत तयारी करण्यात आली होती. या कार्यक्रमाला मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद नागपूर सौम्या शर्मा या हजर राहणार असल्याकारणाने येथील सरपंच मदन सावरकर , उपसरपंच विनोद सावरकर तथा ग्रामविकास अधिकारी ए. टी. गिरमकर तसेच सदस्यगण यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय्यत तयारी केली होती. सकाळी ११.३० वाजता दरम्यान मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा ह्या शितलवाडी ग्रामपंचायतच्या प्रांगणात दाखल झाल्या. सर्वप्रथम त्यांनी प्रांगणात उभारलेल्या शीला फलकाचे पूजन केले त्यानंतर पंचप्राण शपथ घेण्यात आली. यानंतर वसुधा वंदन दरम्यान वृक्ष लागवड करण्यात आले. सौम्या शर्मा यांच्या हस्ते येथे वृक्ष लागवड करण्यात आले. यानंतर ग्रामपंचायतीच्या सभागृहात जागतिक आदिवासी दिन तथा क्रांती दिन निमित्त बिरसा मुंडा, महात्मा गांधी तथा डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर बचत गट तथा उपस्थितांना मुख्य कार्यपालन अधिकारी सौम्या शर्मा, बी.डी.ओ. जयसिंग जाधव तथा मान्यवरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन तथा आभार प्रदर्शन पंचायत विस्तार अधिकारी सुभाष सानप यांनी केले. यावेळी उपस्थितांमध्ये बी.डी.ओ. जयसिंग जाधव , सहाय्यक गट विकास अधिकारी चरपे, पंचायत विस्तार अधिकारी सुभाष सानप , शाखा अभियंता हुशानंद निमजे , कक्ष अधिकारी योगेश हरडे , शितलवाडी ग्रा.पं. चे ग्रामविकास अधिकारी ए. टी. गिरमकर , सरपंच मदन सावरकर , उपसरपंच विनोद सावरकर , ग्रामपंचायत सदस्य आशिष भोगे , नितीन कापसे , बालमवार तथा इतर ग्रामपंचायत सदस्य व शाळकरी मुले उपस्थित होते.
अभियानाची अशी राहील रुपरेषा
सदर अभियान हे ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत राहाणार आहे. त्यामध्ये पहिले म्हणजे संबंधीत ग्रामपंचायतीने आपल्या प्रांगणात किंवा शाळेच्या प्रांगणात किंवा अमृत सरोवर येथे शिलाफलक लावायचे आहे, दुसरे म्हणजे वसुधा वंदन कार्यक्रम घेऊन त्यामध्ये ७५ देशी वृक्षांची अमृत वाटिका तयार करायची आहे. तिसरे म्हणजे स्वातंत्र्यसैनिक वीरांना वंदन करायचे आहे. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणारे स्वातंत्र्यसैनिक आर्मीतील आजी-माजी सैनिक यांचा शाल तथा श्रीफळ देऊन सत्कार करायचा आहे. यानंतर पंचप्राण शपथ घ्यायची आहे, यावेळी हातात दिवे घेऊन पंचप्राण शपथ घ्यायची आहे. यावेळी पदाधिकारी अधिकारी तथा नागरिक उपस्थित ठेवायचे आहे. यानंतर सरते शेवटी १५ ऑगस्ट ला झेंडावंदन करून या अभियानाची सांगता होईल.