– संदीप कांबळे
– रखरखत्या उन्हात ५०० विद्यार्थी होस्टेलमध्ये जेरबंद… जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही अद्याप कार्यवाही नाही…पालकांमध्ये रोष..
नागपूर (ता ३) – जिल्ह्यातील परशिवणी तालुक्यात नवेगाव खैरी येथिल जवाहर नवोदय विद्यालयात होस्टेलमध्ये राहणारे सुमारे ५०० विद्यार्थी उन्हामुळे त्रस्त झाले असून तिथे अद्यापही कुलरची व्यवस्था करण्यात आली नाही. तसेच पाणी टंचाईमुळे त्यांचे हाल होत आहेत. मुलं पालकांना घरी परतण्यासाठी रडून विनंती करीत आहेत त्यामुळे पालकांची चिंता वाढली असून प्रशासनाविषयी त्यांच्यामध्ये रोष आहे तात्काळ शाळा बंद करून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करावी अशी मागणी पालकांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी,खासदार कृपाल तुमाने, जिल्हाधिकारी विमला आर व जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण सभापती उज्वला बोढारे यांना केली आहे.
हे सर्वज्ञात आहे की नागपूर विभागातील उन्हाळी हंगाम अत्यंत उष्ण आणि दमट असतो. या दिवसांमध्ये प्रतिकूल होते आणि उष्णतेच्या लाटेमुळे तापमान ४५ अंशांपर्यंत आणि आर्द्रता ६०% पेक्षा जास्त वाढते. यावर्षी तर दररोज तापमानात झपाट्याने वाढ होत आहे.दरवर्षी जवाहर नवोदय विद्यालयाला एप्रिल महिन्याच्या शेवटी सुट्या लागतात. परंतु यावर्षी २२मे पर्यंत शाळा सुरू राहणार असल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून कळविण्यात आले आहे. आदरणीय यावर्षी ज्या प्रमाणात उन्हाचा जोर वाढला आहे. या रखरखत्या उन्हात मुलांना ज्या होस्टेल मध्ये राहण्याची व्यवस्था आहे. ती इमारत एकमजली आहे. त्यामुळे या उन्हामुळे होणाऱ्या उकाळ्यापासून बचाव होण्यासाठी थंड हवेसाठी पुरेशा पायाभूत सुविधा आणि कूलर उपलब्ध नाहीत. उन्हाच्या तडाख्यात शाळेला पाणीटंचाई चा पण सामना करावा लागत आहे. मुलांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागपूर जिल्ह्यात उन्हाळ्यात विशेष सुविधेशिवाय शाळा सुरु ठेवणे आव्हानात्मक होते. ही बाब ओळखून आपल्याकडून यापूर्वीच १ मे च्या आधी जिल्ह्यातील शाळा (इयत्ता १ ते १०) बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय पाण्याची उपलब्धता, लोडशेडिंग (वीज कपात), कुलिंग सिस्टमची उपलब्धता इत्यादी समस्यांशी झुंजत आहे…
या मूलभूत सुविधांशिवाय अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणे अत्यंत कठीण आहे. होस्टेल मध्ये राहणारी लहान मुले त्रस्त झाली आहेत. इतक्या भयंकर ऊन्हात मुलांच्या आरोग्याच्या विचाराने आम्ही पालक सुद्धा चिंतीत आहोत. मे महिन्यात शालेय उपक्रम चालू ठेवण्यास परवानगी दिल्यास कोणतीही अप्रिय घटना घडू शकते.
म्हणून मानवतावादी आधारावर मुलांच्या परीक्षा संपल्या त्यांना घरी जाण्यासाठी परवानगी देण्यात यावी. शैक्षणिक सत्र सुरु ठेवायचेच असेल तर अभ्यासाचे नुकसान टाळण्यासाठी १ ते २२ मे दरम्यान विद्यार्थ्यांना घरूनच ऑनलाइन वर्गाची परवानगी द्यावी.विद्यार्थ्यांना जर घरी पाठविण्यात येत नसेल तर वसतिगृहाच्या सर्व १६ हॉल मध्येतात्पुरती कुलरची व्यवस्था करण्यात यावी . तसेही २२ मे पर्यंत रविवार व सण बघता ५ दिवस सुट्या आहे. तसेच १० व १२ वी ची सिबीएससी बोर्ड परीक्षा केंद्र असल्याने ८ दिवस पेपर असल्याने शालेय वर्ग होणार नाहीत. म्हणून केवळ काही दिवसाच्या शाळेकरिता इतके दिवस मुलांना कडक उन्हात होस्टेल मध्ये ठेवणं म्हणजे त्यांना नाहक त्रास देण्यासारखे आहे.
जर होस्टेल मध्ये कुलरची व्यवस्था होत नसेल तर मुलांना पालकांकडे जाऊ द्यावे. विद्यार्थ्यांना मे महिन्यात घरबसल्या ऑनलाइन वर्गांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी. या शाळेत ५०० विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे या विषयावर आपण तात्काळ निर्णय घेऊन सर्व पालकांचे समाधान करावे अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व लोकप्रतिनिधी ना दिले आहे. मात्र अद्यापही याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असून ४४डिग्री तापमानात विद्यार्थ्यांचे हाल होत आहे.रात्री होस्टेलमध्ये गरमीपासून बचावाकरिता मुलं ओला कापड अंगावर घेऊन झोपत आहेत. कडक उन्हामुळे जिल्ह्यातील सर्व विभागाच्या शाळा ह्या २ मे पासून बंद करण्यात आल्या आहेत.उष्णतेचा इशारा राज्य शासनाकडून देण्यात आला आहे .तरीही केवळ जवाहर नवोदय विद्यालय सुरू आहे. याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी ते करीत आहेत. *पालकांनी संबंधितांना केले इमेल* या विषयावर विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत असून नवोदय विद्यालय समिती चे अध्यक्ष, संबधीत विभागाचे उपायुक्त, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार कृपाल तुमाने, जिल्हाधिकारी विमला आर यांना पालकांनी इमेल सुद्धा पाठविले आहेत *खासदार तुमाने व सभापती बोढारे यांनी याबाबत* जिल्हाधिकारी नागपूर यांना पत्र सुद्धा पाठविले आहे .लहान बालकांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा संपल्या त्या मुलांना तात्काळ सुटी देण्याविषयी त्यांनी कळविले आहे.मात्र जिल्हाधिकारी यावर का कार्यवाही करीत नाही?हा प्रश्न निर्माण झाला आहे