– भाजपा विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांचे प्रतिपादन
– मराठा समाजासाठी महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांच्या पुस्तिकेचे प्रकाशन
मुंबई :- समाजातील सर्वच घटकांच्या विकासासाठी काम करणाऱ्या महायुती सरकारने मराठा समाजासाठीही उत्तम प्रकारे काम केले आहे. समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी ‘मराठा समाज टाका पाऊल प्रगतीचे’ या पुस्तिकेतून जनतेला फडणवीस सरकारने व महायुती सरकारने घेतलेल्या निर्णयांची उपयुक्त माहिती मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी मंगळवारी व्यक्त केला.भाजपाच्या मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत आ. दरेकर बोलत होते. यावेळी ‘मराठा समाज टाका पाऊल प्रगतीचे’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन हे यावेळी उपस्थित होते.
आ. दरेकर यांनी सांगितले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 30 नोव्हेंबर 2018 रोजी मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत (एसईबीसी) आरक्षण लागू केल्याने त्याचा त्या काळात मराठा तरुण तरुणींना शिक्षण व प्रशासकीय सेवेत प्रत्यक्ष लाभ झाला. शैक्षणिक प्रवेश आणि सुमारे 2400 डॉक्टर झाले. सन 2018 ते 2021 आरक्षण लागू असलेल्या काळात तसेच 2024 मध्ये शासकीय आणि निमशासकीय सेवेत कायमस्वरूपी लागलेल्या मराठा समाजातील उमेदवारांची संख्या सुमारे आठ हजार आहे. 2024 मध्ये झालेल्या पोलीस भरतीत एसइबीसी मधून 867 पोलीस भरती झाली. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय प्रवर्गाअंतर्गत दिल्या गेलेल्या मराठा आरक्षणास 9 सप्टेंबर 2020 रोजी स्थगिती येण्यापूर्वी निवड झालेल्या परंतु नियुक्ती न मिळालेल्या सुमारे 3700 वंचित उमेदवारांना सामावून घेण्यासाठी अधिसंख्य पदाचा कायदा करून नियुक्त्या करण्यात आल्याची माहितीही यावेळी आ. दरेकर यांनी यावेळी दिली.