संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– प्रलंबित प्रकरणातील मुद्रांक शुल्क व दंडाच्या रकमेत सूट मिळणार
कामठी :- महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक शुल्क विभागाने महाराष्ट्र मुद्रांक शुल्क अभय योजना 2023 सुरू केली आहे. या अंतर्गत थकीत मुद्रांक शुल्काचे टप्पे करण्यात आले असून त्यानुसार दंडात आणि मुद्रांक शुल्क रकमेमध्ये सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक जणांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कामठी चे दुय्यम निबंधक अनिल भिवगडे यांनी केले आहे.
तसे याबाबतचे पत्रक मुद्रांक शुल्क विभागाने जाहीर सुद्धा केले आहे. अभय योजनेसाठी १ जानेवारी १९८० ते ३१ डिसेंबर २०२० हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. यातील पहिला टप्पा १ डिसेंबर २०२३ ते ३१ जानेवारी २०२४ असा आहे. यामध्ये १ लाखापर्यंतच्या मुद्रांक शुल्कामध्ये १०० टक्के सूट देण्यात आली आहे. तर दंडामध्येही १०० टक्के सूट देण्यात आली आहे. एक लाखापेक्षा अधिक मुद्रांक शुल्क वसुलीसाठी मुद्रांक शुल्कामध्ये ५० टक्के सवलत दिली आहे. तर दंडामध्ये १०० टक्के सूट आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी १ फेब्रुवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ हा कालावधी निश्चित केला आहे. या अंतर्गत १रुपया ते १ लाख रुपया पर्यंतच्या रकमेच्या मुद्रांक शुल्कात 80 टक्के सूट व दंडातही 80 टक्के सूट देण्यात आली आहे तसेच १ लाख व त्यापेक्षा अधिक रकमेच्या मुद्रांक शुल्कात ४० टक्के सवलत देण्यात आली आहे. तर दंडावर ७० टक्के सूट आहे. त्या पुढील टप्प्यात १ जानेवारी २००१ ते ३१ डिसेंबर २०२० हा कालावधी ग्राह्य धरण्यात आला आहे. यामध्ये १ ते २५ कोटी पर्यंतच्या मुद्रांक शुल्कात २५ टक्के सूट आहे. तसेच यावरील दंडाच्या रक्कम २५ लाखांपेक्षा कमी असेल तर त्याला ९० टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच दंडाची रक्कम २५ लाखांपेक्षा जास्त असेल तर २५ लाख दंड घेऊन वरील रक्कमेची सूट देण्यात आली आहे. तसेच निश्चित केलेल्या कालावधीत मुद्रांक शुल्काची रक्कम २५ कोटीं पेक्षा अधिक असेल तर २० टक्के सूट देण्यात आला आहे. तर १ कोटी रक्कम दंड म्हणून स्वीकारली जाईल व उर्वरित दंडाच्या रकमेवर सूट देण्यात आली आहे.
सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदारास विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह संबंधित मुद्रांक जिल्हाधिकारी नागपूर ग्रामीण किंवा दुय्यम निबंधक श्रेणी -1कामठी यांच्याकडे दिनांक 1 डिसेंबर 2023 ते 31 मार्च 2024 या कालावधीत सादर करणे आवश्यक राहील .सदर अर्जाचा नमुना नोंदणी व मुद्रांक विभागाच्या (www.igmaharashtra.gov.in)या संकेत स्थळावर प्रकाशने परिपत्रक मुद्रांक अभय योजना या सदराखाली अभय योजना 2023 शासन आदेश नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध आहेत तेव्हा नागरिकांनी या मुद्रांक शुल्क अभय योजनेचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन कामठी चे दुय्यम निबंधक श्रेणी-1 अनिल भिवगडे यांनी केले आहे.