नागपूर :- जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय, नागपूर महानगरपालिका व ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रेबीज रोगप्रतिबंधक लसीकरण व निर्बीजीकरण शस्त्रक्रिया शिबिराचे यशस्वीपणे आज आयोजन करण्यात आले. महाराज बाग रोडवरील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय येथील शिबिरात श्वान प्रेमी व पशुप्रेमी नि:शुल्क रेबीज रोग प्रतिबंधक लसीकरण व निर्बीजीकरण शस्त्रक्रिया शिबिरात सहभागी झाले.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नितीन फुके यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र पशुवैद्यक परिषदेचे अध्यक्ष डॉ. अजय पोहरकर, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. युवराज केने यावेळी उपस्थित होते.
शिबिरात एकुण 118 श्वानदंश प्रतीबंधक लसीकरण करण्यात आले. 13 निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जगात दरवर्षी रेबीज रोगामुळे अंदाजे 65 हजार लोकांचा मृत्यू होतो. त्यापैकी श्वानदंशामुळे रेबीज होण्याचे 99 टक्के प्रमाण आहे. या रोगाला उष्म रक्ताचे व सर्व सस्तन प्राणी मानवासहित बळी पडू शकतात. रेबीज झालेल्या एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याला रोग प्रादुर्भाव होत असतो. रेबीज रोगावर उपचार नसला तरी रोग प्रतिबंधक लसीकरण हाच एकमेव उपाय आहे. या रोगाचा प्रादुर्भाव थांबविण्याकरिता सर्व श्वानांना व मांजर वर्गीय प्राण्यांना वार्षिक श्वानदंश रोग प्रतिबंधक (रेबीज) लसीकरण करणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे 2030 पर्यंत रेबीज रोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.
शिबिर यशस्वीतेसाठी डॉ. गजेंद्र महल्ले, डॉ. भदाडे, डॉ. राजेंद्र रेवतकर, डॉ. मयुर काटे, डॉ. सवाईमुल, डॉ. वैशाली आजनकर, डॉ. शशिकांत जाधव, डॉ. राहुल बॉबटकर, डॉ. प्रियंवदा सिरास, डॉ. पल्लवी गावंडे, डॉ. प्रदीप गावंडे यांचे योगदान लाभले.