जिल्ह्यातील प्रत्येक रस्ता अपघातमुक्त करा! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

– आवश्यक उपाय योजनांसह रुग्णवाहिका सुसज्ज ठेवण्याच्या सूचना

नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील प्रत्येक रस्ता अपघातमुक्त करण्यासाठी प्रशासनातील सर्व विभागांनी समन्वयातून काम करावे, असे निर्देश केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी आज (रविवार) दिले.

रवी भवन सभागृहात नागपूर झीरो फॅटलिटी डिस्ट्रिक्ट रिव्ह्यू आणि जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी जिल्हा रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अ‍भिजीत चौधरी, नागपूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. हर्ष पोद्दार उपस्थित होते.

नागपुरातील जिल्हाप्रशासन, वाहतूक यंत्रणा तसेच सर्व रस्ते बांधणी संस्थांनी रस्ते अपघात प्रतिबंधाविषयी समन्वय साधला पाहिजे. सेव्ह लाईफ फाउंडेशन सारख्या स्वयंसेवी संस्थांनी अपघात प्रवण स्थळांची सुधारणा करण्यासाठी सुचवलेल्या उपाययोजना राबविल्या पाहिजे. स्वयंसेवी संस्थांच्या सोबत प्रशासनाने देखील काम करून लोकांना रस्ते सुरक्षा संदर्भात जागरूक करण्याची गरज आहे. रस्ते सुरक्षा क्षेत्रात लोकसहभाग मोठ्या प्रमाणात वाढवावा, असे आवाहन ना. गडकरी यांनी केले.

रस्ते सुरक्षा क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘सेव लाईफ’ या स्वयंसेवी संस्थेचे अध्यक्ष प्रविण तिवारी यांनी नागपूर ग्रामीण आणि शहरात घडलेल्या रस्ते अपघातांची तसेच त्यावर संबंधित यंत्रणेला सुचवलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. नागपूर ग्रामीणमध्ये गेल्या वर्षी 440 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. यावर्षी अपघाताच्या संख्येत 4 टक्के घट झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गेल्यावर्षी नागपूर शहरात 308 मृत्यू झाल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली.

अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्ताला त्वरित वैद्यकीय मदत मिळण्यासाठी ॲम्बुलन्सच्या आतच अपघातग्रस्त वाहनातून वाहनाचे भाग कापून जखमींना बाहेर काढण्याची सोय असावी. तसेच त्वरित वैद्यकीय मदत घटनास्थळीच मिळण्यासाठीचा एक प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देता यावा. यादृष्टीने वैद्यकीय विभाग, पोलीस विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने समन्वय साधून यंत्रणा तयार करावी. जेणेकरून अपघातानंतरच्या गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांचा जीव वाचेल, अशी सूचनाही ना. गडकरी यांनी केली.

सार्वजनिक बांधकाम विभागाला सेव्ह लाईफ फाउंडेशनने 57 अपघात प्रवण स्थळांमध्ये सुधारणा सूचविल्या होत्या. त्यातील बरेच काम पूर्ण झाले असून नवीन ब्लॅक स्पॉट्सच्या निवारणाचे काम येत्या काळात पूर्ण करण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वर्दळीच्या रस्त्यावर फुट ओव्हर ब्रिजच्या माध्यमातून दुचाकी चालक, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना रस्ता पार करण्यासाठीच्या सुविधेची सुद्धा चाचपणी यंत्रणांनी करावी. शहरातील फुटपाथ मोकळे नसल्यामुळे खूप अपघात होतात. त्यामुळे अशा फुटपाथवरील अतिक्रमण पोलिस संरक्षणात कडक कारवाईने मोकळे करावे. तसेच ज्या फुटपाथवर पक्के बांधकाम आहे ते सुद्धा काढून टाकण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी महानगरपालिका आयुक्त यांना दिले.

पार्किंगच्या नियमांची धास्ती लोकांना व्हावी याकरिता नो पार्किंग मध्ये लावलेल्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याचे निर्देशही वाहतूक पोलिसांना ना. गडकरी यांनी यावेळी दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मध्यप्रदेश ने दोनो वर्ग मे महाराष्ट्र को हराकर बनी चैम्पियन छत्तीसगढ ने जीता कास्य पदक

Mon Jul 29 , 2024
– द्वितीय हॉकी इंडिया वेस्ट जोन का हुआ समापन – सांसद संतोष पाण्डेय,पूर्व सांसद व पूर्व महापौर मधुसूदन यादव, एवं सुरूची सिंह, राजेश जैन ने बांटे पुरूस्कार राजनांदगांव :- मध्यप्रदेश की बालिकाओं ने आज रोमांचक व संघर्षपूर्ण फायनल मुकाबले में पैनाल्टी शूटआउट में महाराष्ट्र को 5-4 गोल से वहीं बालक वर्ग में भी मध्यप्रदेश दिलचस्प मुकाबले में महाराष्ट्र को 6-4 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!