मापुसा :-अक्षता ढेकळेच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाने यजमान गोव्याला २-१ असे हरवून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अभियानाला विजयाने आरंभ केला.
मापुसा येथील पेड्डीम क्रीडा संकुलात झालेल्या या ब-गटाच्या सामन्यात सातव्या मिनिटाला प्रियांका वानखेडेने मैदानी गोल करीत महाराष्ट्राचे खाते उघडले. दोनच मिनिटांनी अक्षताने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करून महाराष्ट्राची आघाडी २-० अशी वाढवली. दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. परंतु तिसऱ्या सत्रात ३१व्या मिनिटाला मनिताने गोव्याचा पहिला गोल नोंदवला. त्यानंतर चौथ्या सत्रात गोव्याचे बरोबरी साधण्याचे प्रयत्न महाराष्ट्राच्या बचाव फळीने हाणून पाडले. त्यामुळे हा विजय साकारता आला. महाराष्ट्राचा पुढील सामना गुरुवारी झारखंडशी होणार आहे.