– बिबट्याचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिवसा विजपुरवठा करण्याची मागणी !
मोर्शी :- गेल्या काही दिवसांपासून मोर्शी तालुक्यातील घोडदेव डोंगरयावली दापोरी सालबर्डी हिवरखेड परिसरामध्ये बिबट्याने अक्षरशः थैमान घातले आहे. या भागातील जाणवरांवर हल्ला करून, गाई, वासरे व शेळ्या फस्त केल्या आहेत. बिबट आणि त्याच्या पिल्लांचा वावर घोडदेव डोंगरयावली दापोरी सालबर्डी हिवरखेड परीसरात असल्याचे मोर्शी वनविभागाने देखील जाहीर केले आहे. बिबट्याने जनावरांवर केलेल्या हल्ल्यामुळे अनेक जनावरे मृत्यूमुखी पडून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे घोडदेव डोंगरयावली दापोरी सालबर्डी हिवरखेड भागातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी वन परिक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
संपूर्ण जिल्ह्यामध्ये शेतीला दिवसा वीज पुरवठा सुरू आहे मात्र मोर्शी तालुक्यात हिवरखेड फिडर अंतर्गत येणाऱ्या दापोरी डोंगर यावली घोडदेव सालबर्डी हिवरखेड या भागामध्ये शेतीला रात्रीचा वीज पुरवठा केला जात आहे. या परिसरामध्ये संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आंबिया बहार संत्रा फोडण्यासाठी संत्राला पाणी देणे गरजेचे आहे अश्यातच या भागामध्ये बिबट्याने हैदोस घातल्यामुळे रात्रीला शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना ना इलाजने आपला जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. अश्या परिस्थितीत शेतकऱ्यांना शेतीसाठी रात्रीचा विजपूरवठा केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निर्माण होत असून शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्यासाठी शासन प्रशासनाने शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीजपुरवठा द्यावा अशी मागणी यावेळी ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन केली आहे.
वन विभगाचे अधिकारी, महावितरण कंपनीचे अधिकारी जिल्हाधिकारी यांनी दापोरी डोंगर यावली घोडदेव सालबर्डी हिवरखेड येथील शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्येची दखल घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीचा गांभीर्याने विचार करून, नागरिकांसाठी धोकादायक असणाऱ्या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा व शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी तसेच शेतकऱ्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा रुपेश वाळके यांनी वन परिक्षेत्र अधिकारी, उप विभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता महावितरण, तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला यावेळी ग्राम पंचायत सदस्य रुपेश वाळके, सचिन उमाळे, अतुल काकडे, राजू पाटील, मंगेश होले यांच्यासह आदी शेतकरी उपस्थित होते.
शासनाच्या चुकीच्या धोरणाचा शेतकऱ्यांना फटका !
नुकतेच महावितरणने जानेवारी महिन्याचे कृषिपंपासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. यामध्ये रात्री ११.५५ ते सकाळी ६.५५ पर्यंत असा वीजपुरवठा केला जात आहे. ही वेळ शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत चुकीची ठरत आहे. रात्रीच्या वेळी शेतकरी पिकांना पाणी द्यायला जात असतांना बिबट्या, डुक्कर, कोल्हा, साप, विंचू यांसारखे वन्यप्राणी शेतकऱ्यांवर हल्ला करू शकतात. सध्याचे कृषिपंपाचे वीजपुरवठा वेळापत्रक शेतकऱ्यांसाठी त्रासदायक व गैरसोयीचे ठरत असून शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गमवावा लागू शकतो
– रुपेश वाळके ग्राम पंचायत सदस्य दापोरी.