चंद्रपुरातून सुरू होणारी ‘क्लायमेट चेंज’ची चळवळ देशव्यापी व्हावी- आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला मानस

– ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज’ १६ जानेवारीपासून

चंद्रपूर :- येथे तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये पुढील ३० वर्षांच्या पर्यावरणाची बिजे रोवली गेली पाहिजे. तसेच ‘क्लायमॅट चेंज’ ही चंद्रपुरातून सुरू होणारी चळवळ देशव्यापी व्हायला हवी, अशी अपेक्षा राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

पर्यावरण जागृतीसाठी जागतिक स्तरावरील ही परिषद चंद्रपूर येथे होत असल्याचा नक्कीच अभिमान असल्याचेही आ. मुनगंटीवार म्हणाले. एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांनी सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क, अमेरिका यांच्या शैक्षणिक सहकार्याने आणि सोबतच महाराष्ट्र शासनाच्या मँग्रोव्ह फाऊंडेशन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा प्रशासन, चंद्रपूर महानगरपालिका, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, इकोलॉजिकल सोसायटी, पुणे आणि चंद्रपूर वन अकादमी यांच्या एकत्रित सहकार्याने चंद्रपूर येथे तीन दिवसीय ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन क्लायमेट चेंज- २०२५’ चे आयोजन दिनांक १६ जानेवारी ते १८ जानेवारी २०२५ या कालावधीत वन अकादमी येथे करण्यात येणारं आहे.

या कॉन्फरन्सचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांच्या हस्ते होणार आहे.तर विशेष पाहुणे म्हणून राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक राहतील. यावेळी जलपुरुष राजेंद्रसिंह, चाणक्य मंडळ प्रमुख अविनाश धर्माधिकारी, सलील कादेर,अमेरिकेतील हवामान तज्ञ डॉ. नील फिलिप, डॉ. परिमिता सेन, डॉ. दुराई स्वामी, डॉ अमित होरडे, डॉ सुधाकर परदेशी, आयआयटी मुंबईच्या हरिप्रिया यांचेही मार्गदर्शन लाभणार आहे. प्रोफेसर रुबी ओझा, अतिरिक्त मुख्य सचिव वेणूगोपाल रेड्डी, अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव यांच्यासह इतर आदी पाहुणे उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आ. मुनगंटीवार यांची मंगळवार, दि. १४ जानेवारीला पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला यावेळी एसएनडी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव, प्रभारी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, एसएनडीटी बल्लारपूर कॅम्पस संचालक डॉ. राजेश इंगोले,डॉ. मंगेश गुलवाडे, नम्रता ठेमस्कर उपस्थित होते.

आ. मुनगंटीवार म्हणाले, ‘२०५० पर्यंत शेतीचे उत्पादन ३० टक्क्यांनी कमी होणार आहे. तेव्हा परिस्थिती भीषण होईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाने दिला आहे. त्यामुळे या कॉन्फरन्सच्या बिजारोपणातून हजारो लोकांना जोडावे लागणार आहे. त्यासाठी अॅप तयार करण्यात आले आहे. ते लवकरच वापरासाठी उपलब्ध होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेला पर्यावरणावर प्रेम करणाऱ्या पर्यावरण प्रेमींनी व स्वयंसेवी संस्थांनी उपस्थित राहावे.’

पर्यावरणासाठी जेवढ्या संघटना, संस्था काम करतात, त्यांना देशस्तरावर एकत्र आणता येईल का, याचाही विचार या तीन दिवसांत होणार आहे. दिल्लीत मार्च-एप्रिलमध्ये परिषद घेण्याचाही विचार आहे. चंद्रपुरातील क्लायमेट चेंजची ही चळवळ आधी राज्यव्यापी आणि नंतर देशव्यापी करायची आहे. त्यासाठी प्रत्येकाने काम करावे, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले.

प्रभातफेरीने होणार सुरुवात

या परिषदेच्या पहिल्या दिवशी महापालिकेने सकाळी ८.३० ते ९ या वेळात पर्यावरण रॅलीचे आयोजन केले आहे. गांधी चौकातून ही रॅली निघेल आणि प्रियदर्शनी सभागृहापर्यंत जाऊन तेथे रॅलीचा समारोप होईल. या प्रभात फेरीमध्ये चंद्रपूरकरांनी मोठया संख्येने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले.

चळवळ मोठी होणार

या कॉन्फरन्सचं महत्त्व समाज आणि सृष्टीशी संबंधित आहे. मकरसंक्रांती नंतरचं हे पर्व आहे. २१ जूनपर्यंत दिवस मोठा होत जाणार आहे. आता दिवस मोठा मोठा होत जातो. अगदी त्याचप्रमाणे ही चळवळही मोठी होत जाणार, असा विश्वास आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

शेती आणि उद्योगावर फोकस

क्लायमेट चेंजनंतर आरोग्य आणि शेतीवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. जैविक शेती, सेंद्रीय शेती यामध्ये कार्य केल्यास प्रदूषणाला तोंड देता येईल. चंद्रपूरमध्ये प्रदूषणाची धोक्याची पातळी अध्येमध्ये वाढलेली असते. येथील उद्योगांमुळे हे होत आहे. उद्योग आवश्यकच आहेत. पण हे उद्योग प्रदूषण वाढविणारे नकोत. उद्योग बंद करू शकत नाही. कारण त्यावर लोकांची उपजिविका आहे. त्यामुळे उद्योग आणि प्रदूषण याचे संतूलन साधावे लागेल, असेही आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

राष्ट्रीय कुराश (कुस्ती) स्पर्धेत आयुषी ठाकरे ला रौप्य पदक

Wed Jan 15 , 2025
कन्हान :- स्कूल गेम फेडरेशन ऑफ़ इंडिया रायपुर (छत्तीसगढ़) च्या व्दारे आयोजित राष्ट्रीय शालेय कुराश (कुस्ती) स्पर्धेत बीकेसीपी स्कुल कन्हान ची विद्यार्थींनी आयुषी ठाकरे हिने रौप्य पदक पटक विल्याने कन्हान शहरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रायपुर (छत्तीसगड) येथे स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या सौजन्याने नुकत्याच झालेल्या ६८ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ मध्ये बिहा रीलाल खंडेलवाल पब्लिक स्कुल कन्हानची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!