नागपूर :- नागपूर ग्रामीण घटकात वयोवृध्द महिलांना गंडा घालून त्यांची फसवणुक करणारी आंतरराज्यीय सराईत गुन्हेगारांची टोळी मागील काही दिवसांपासून सक्रिय झाली होती. या टोळीतील गुन्हेगार वयोवृध्द महिलांना एकटे गाढून त्यांना पैश्याचे आमिश दाखवून त्यांचे अंगावरचे दागीने हातचालाखीने उतरवित असायचे व संधी साधून पसार होत व्हायचे, नागपूर ग्रामीण जिल्हयात मागील एक महिण्यांपासून कळमेश्वर, काटोल, खापरखेडा, मौदा या ग्रामीण भागात वयोवृध्द महिलांना गंडा घालून त्यांचे दागीने पळविल्याच्या घटनेची गंभीर दाखल घेवून नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री हर्ष पोहार यांनी अश्या गुन्हेगारांचा छडा लावण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे विशेष तपास पथक तयार केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक मागील एक महिण्यांपासून अश्या अपराध्यांच्या शोधात होते. यादरम्यान दिनांक १७/०८/२०२४ रोजी त्यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, कळमेश्वर आणि फेटरी येथे वृध्द महिलांना गंडा घालून त्यांचेकडील सोन्याचे दागीणे पळविणाऱ्या टोळीतील बबलू बिरचंद सोळंकी वय २६ वर्ष, रा. प्लॉट नं. १४५, अध्यापक नगर, महल्ले सभागृह समोर, मानेवाडा रिंगरोड, नागपूर हा कळमेश्वर मध्ये फिरत आहे. त्यावरुन बबलू सोळंकी याला कळमेश्वर येथून ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचे इतर तिन साथीदार १) हरि गंगाराम राठोड वय ४५ वर्ष रा. नोबल नगर, अहमदाबाद गुजरात ह.मु. ग्राम वरसल, मांजलपूर जि. वडोदरा, गुजरात, २) मुकेश बाबुलाल राठोड, वय २० वर्ष रा. नोवल नगर, अहमदाबाद गुजरात आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांचेसोबत मिळून कळमेश्वर, काटोल, खापरखेडा आणि मौदा हद्दीत काही वृध्द महिलांना गंडवून त्यांचे जवळील सोन्याचे दागीने लबाडीने प्राप्त केले व घटनास्थळाहुन पसार झाल्याची माहिती दिली. बबलू सोळंकी याचे साथीदार गुन्हा केल्यानंतर गुजरात राज्यात पळून जात असल्याची माहिती बबलू कडून प्राप्त झाली.
बबलू सोळंकी याचे ताब्यातून ६ नग सोन्याचे मनी, १ डोरल वजन अंदाजे १ ग्रॅम, ८००/- रुपये रोख आणि गुन्हयात वापरलेला मोबाईल फोन असा एकुण १६,३००/- रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला. सदर आंतरराज्यीय टोळीने नागपूर ग्रामीण जिल्हयात खालील प्रमाणे एकुण ०४ गुन्हे केल्याचे उघडकीस झाले आहे.
१) पो.स्टे. कळमेश्वर गुन्हे रजि.नं. ६०७/२०२४ कलम ३१८(४) भारतीय न्याय संहिता
२) पो.स्टे. काटोल गुन्हे रजि. नं. ६५२/२०२४ कलम ३०५ (अ) ३(५) भारतीय न्याय संहिता
३) पो.स्टे. खापरखेडा गुन्हे रजि. नं. ४११/२०२४ कलम ३१८(४), ३(५) भारतीय न्याय संहिता
४) पो.स्टे. मौदा गुन्हे रजि. नं. ७१२/२०२४ कलम ३१८(२),३१८(४), ३
(५) भारतीय न्याय संहिता
सदर कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक किशोर शेरकी, आशिषसिंह ठाकूर, पोलीस हवालदार दिनेश आधापूरे, ईक्बाल शेख, राजेन्द्र रेवतकर, रोशन काळे, संजय वान्ते सायबर सेलचे पोलीस नायक सतिष राठोड यांनी पार पाडली.