महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठात सरन्यायाधीशांचा हृद्य सत्कार
नागपूर ४ : मनुष्याने केलेली कुठलीही कृती, वागणूक यासंदर्भात न्याय देण्याची शक्ती समाजाने न्यायाधीशांना प्रदान केली आहे. या शक्तीच्या भरवश्यावर न्यायाधीश कायद्याच्या अंमलबजावणीतून सदृढ लोकशाहीचे निर्माण करु शकतात. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी न्यायिक क्षेत्राला प्रबळ व्यवसाय म्हणून पहावे, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी आज येथे केले.
वारंगास्थित महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाव्दारे न्यायमूर्ती श्री. लळीत यांचा सत्कार करण्यात आला. त्या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित सरन्यायाधीशांच्या सत्कार समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई, सरन्यायधिशांच्या सुविद्य पत्नी अमिता लळीत, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्तो, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती सुनील शुक्रे, न्यायमूर्ती प्रसन्ना वऱ्हाडे, न्यायमूर्ती अतुल चांदुरकर, न्यायमूर्ती अनिल कीलोर, सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. विजेंदर कुमार आदी व्यासपीठावर उपस्थिती होते. तसेच विद्यापीठाचे विधी अभ्यासक्रमाचे शिक्षकवृंद विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती श्री. लळीत म्हणाले, शासकीय विधी महाविद्यालयात शिकत असताना त्यांना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून तसेच विधीतज्ज्ञांच्या अनुभवशील ज्ञानाव्दारे कायद्याचे शिक्षण अवगत करावे लागत असे. त्यांना शिकविणारे शिक्षक हे मुळातच वकील म्हणून न्यायालयात खटले लढत असायचे. त्याकाळी कायद्याचे शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून विविध खटले व न्यायाधीशांच्या निर्णयांचा अभ्यास करुनच अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत असे.
आपल्या देशाला कायदेपंडीतांचा मोठा इतिहास लाभला आहे. वकीलांनाच समाजातील गरीबांच्या कायदेशीर समस्या, सामाजिक समस्या, संविधानिक मुद्दे सोडविण्याचे भाग्य असल्यामुळे पूर्वीच्या काळात वकीली याच पेश्यात अधिकांची ओढ होती. सामाजाला पडणारे अनेक प्रश्न सोडण्यासाठी वकील हाच योग्य पर्याय आहे. आताच्या सद्यस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय दोन्ही न्यायपालिकेत वकीलांची संख्या घटताना दिसून आली आहे, असे त्यांनी सांगितले.
येथील नामांकित राष्ट्रीय विधी विद्यापीठात सर्व सोयीयुक्त वातावरणात कायद्याचे शिक्षण घेत असल्याने आपण नशीबवान आहात. याठिकाणी कायद्यासंदर्भातील कायदेतज्ज्ञांकडून प्रशिक्षण देण्यात येत आहे. विधी क्षेत्राचे अध्यापन करताना विद्यार्थ्यांनी न्यायदानाच्या क्षेत्राला प्रबळ व्यवसाय म्हणून पहावे. कारण याच व्यवसायाच्या माध्यमातून आपण समाजाला अपायकारक असणाऱ्या अनिष्ठ घडामोडींना आळा घालू शकतो. न्यायपालिकेवर विश्वास असणाऱ्या समाजातील गरजूंना आपण या व्यवसायाच्या माध्यमातून न्याय मिळवून देऊ शकतो, असे सरन्यायाधीश श्री. लळीत म्हणाले.
समाजाच्या हितासाठी विधी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी म्हणून तुमचे काय योगदान असावे, या संदर्भात आपण विचार करावा. न्यायिक व्यवसायाला वैद्यकीय पेश्यासारखे महत्व दिले गेल्या पाहिजे. कायद्याची पाच वर्षाची पदवी संपादीत केल्यावर येथील विद्यार्थ्यांना समाजाला भेडसावत असणाऱ्या अनेक प्रश्नांची कायदेशीर उत्तरे सापडलेली असेल. पाच वर्षाचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर आपण सुध्दा इतर वकीलांसारखे न्यायालयात खटले लढण्यासाठी भाग घेऊ शकणार. या विद्यापीठातील अभ्यासक्रमाप्रमाणेच इतर विधी महाविद्यालयातही याचप्रमाणे अभ्यासक्रम शिकविले गेले पाहिजे.
न्यायिक क्षेत्रात पिरॅमिडसारखी निर्माण झालेली परिस्थिती बदलविण्यासाठी विधी क्षेत्रातील तरुणांनी आव्हान स्वीकारुन आपल्या गुणवत्तेच्या जोरावर न्यायपालिकेत आपले स्थान काबिज करावे. नागरी सेवा उत्तीर्ण करण्यासाठी कित्येक तरुण ज्याप्रमाणे जिद्दीने परिश्रम करतात त्याचप्रमाणे कायद्याचे शिक्षण घेणाऱ्यांनी सुध्दा न्यायमूर्ती पदांच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी परीश्रम करावेत. न्यायिक सेवा मध्ये प्रवेश घेऊ ईच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विधी महाविद्यालयात शास्त्रोक्त अभ्यासक्रम, न्यायिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण व पात्रता परीक्षा असे तीन टप्पे असावेत, असेही सरन्यायाधीश श्री. लळीत यांनी सांगितले. यावेळी सरन्यायाधीशांनी विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थींनींना त्यांच्या उज्वल भविष्य, करिअरसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सरन्यायाधीश यांच्या कारकिर्दीचा व त्यांनी भुषविलेल्या विविध न्यायिक पदांचा आलेख मांडला. नागपूरच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाला त्यांची भेट हा अविस्मणीय क्षण असून त्यांचे मार्गदर्शन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी अमुल्य ठेवा ठरणार असल्याचे न्यायमूर्ती श्री. गवई यांनी आपल्या शुभेच्छा भाषणात सांगितले.
विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजेंदर कुमार यांच्या हस्ते सरन्यायाधीश उदय लळीत व त्यांच्या सुविद्य पत्नी अमिता लळीत यांचे शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरन्यायाधीश श्री. लळीत यांनी विद्यापीठाच्या शिकवणीवर्ग, वास्तूची पाहणी केली. सत्कार समारंभात कुलगुरु विजेंदर कुमार यांनी विद्यापीठात सुरु असलेले विधी अभ्यासक्रम, आधुनिक तंत्रज्ञान, सोयी-सुविधा, विद्यार्थी क्षमता आदी संदर्भात प्रास्ताविकातून माहिती दिली तर निबंधक आशिष दिक्षीत यांनी उपस्थितांचे आभार मानले.