सरपंच, उपसरपंच यांना संगणक प्रणाली द्वारे विहित वेळेत मानधन  – मंत्री गिरीश महाजन

मुंबई :- राज्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंच यांना संगणक प्रणाली द्वारे मानधन वितरीत करण्यात येत आहे. यामध्ये सुसूत्रता आणि सुस्पष्टता असून मानधन वेळेत देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत दिली.

सदस्य श्रीकांत भारतीय यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सध्या ग्रामपंचायत खाते आयसीआयसीआय (ICICI) बँकेत आहे. ही खाती इंडियन पोस्टल पेमेंट बँक मध्ये हस्तांतरीत करण्याची मागणी होत आहे. याबाबत योग्य ते सर्वेक्षण करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे मंत्री महाजन यांनी यावेळी सांगितले. कोरोना कालावधीत कर्तव्यावर असतांना मृत्यू झालेल्या सरपंच व उपसरपंच यांना मदत देण्याबाबत शासन सर्व माहिती घेऊन उचित कार्यवाही करेल असेही त्यांनी सांगितले.

नवी मुंबई मध्ये सरपंच भवन उभारण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी भागातील घरकुलांप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांना सुद्धा 2 लाख 50 हजार अनुदान मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु असल्याचेही, मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी सांगितले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com