– साडे तीन हजार कुटुंबीयांना धान्य किट
– जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरपीडित भागाला भेट
– उपमुख्यमंत्र्यांकडून दुसऱ्या दिवशीही आढावा
– उर्वरित पंचनामे दोन दिवसात पूर्ण होणार
– साफसफाईला प्राधान्य देत आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन
नागपूर :- शनिवारच्या मुसळधार पावसानंतर प्रशासन स्तरावरून पंचनाम्याला युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. आतापर्यंत 7 हजार 169 पंचनामे पूर्ण झाले असून 3 हजार 370 कुटुंबीयांना धान्य किटचे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा आणि महानगर प्रशासनाच्या सहकार्याने येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेत घर व दुकानांच्या साफसफाईकडे लक्ष देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
पूरानंतर पंचनाम्याच्या कार्यवाहीसाठी टीम तैनात तयार करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिकेच्या 55 टीम घरोघरी जाऊन पंचनामे पूर्ण करीत आहेत. पंचनामे करणाऱ्या टीम घरी येणार की नाही याविषयी काही नागरिकांमध्ये साशंकता आहे. मात्र, सर्व पूरग्रस्तांच्या पंचनाम्याची कार्यवाही घरी जाऊन करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी निःशंक राहण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
आतापर्यंत सात हजारांवर पंचनामे पूर्ण झाले आहेत. काही लोक पंचनामे न होण्याच्या भीतीपोटी घराची साफसफाई करीत नसल्याचे आढळून आले आहे. मात्र, पूरग्रस्त भागाचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी घरांची साफसफाई पूर्ण करावी. नागरिकांनी पंचनाम्यांची वाट न पाहता साफसफाई करावी, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
दलालांच्या भुलथापांना बळी पडू नका
नागरिकांनी दलालांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचे फॅार्म भरून घेत त्यांना पैसे देऊ नये. जिल्हा प्रशासन किंवा महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांमार्फतच केवळ पंचनाम्यांची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. त्यामुळे दलालांच्या भुलथापांना बळी न पडता जिल्हा प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरपीडित भागाला भेट
जिल्हाधिकाऱ्यांनी आज पीली नदीच्या पुरामुळे बाधीत झालेल्या कामठी रोडवरील भदंत आनंद कौसल्यायन नगरला भेट देत पूरपीडितांच्या समस्या जाणून घेतल्या. लवकरच पंचनामे पूर्ण करण्यात येणार आहेत. मदतीपासून कुणीही वंचित राहणार याची प्रशासनातर्फे काळजी घेण्यात येईल, असे पूरपीडितांना जिल्हाधिका-यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्र्याकडून आढावा
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस पूरानंतरच्या संपूर्ण मदत कार्यावर बारकाईने लक्ष ठेवून असून दररोज आढावा घेत आहेत. आजही त्यांनी पंचनामे तसेच मदतीचा आढावा प्रशासनाकडून घेत गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्याची सूचना प्रशासनास केली. तसेच पंचनाम्याची गती वाढवण्याचे सूचवले आहे.
तहसिल कार्यालयाशी संपर्क साधा
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी सर्व नागरिकांनी मदतीसाठी संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे. ज्यांच्याकडे कोणतेही कर्मचारी पंचनाम्यासाठी आले नाहीत. आपले घर सुटले असे वाटत असेल त्यांनी सिव्हिल लाईन परिसरातील शहर तहसील कार्यालयामध्ये माहिती देण्याचे आवाहन केले आहे.