बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे दोघांवरही कायदेशीर कारवाई व्हावी – राज्यपाल रमेश बैस

मुंबई :- देशाला आत्मनिर्भर बनविताना दिव्यांगांना स्वयंपूर्ण बनविणे आवश्यक आहे असे सांगून सामान्य व सक्षम व्यक्ती चुकीच्या पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सेवेत प्रवेश करणार नाही याबद्दल दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्थांना जागरूक राहावे लागेल, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केले. या संदर्भात बनावट पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेणारे व देणारे अशा दोघांवरही कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.

दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या ‘सार्थक एजुकेशन ट्रस्ट’ या संस्थेचा १६ वा स्थापना दिवस राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २६) जागतिक व्यापार केंद्र मुंबई येथे संपन्न झाला. यावेळी राज्यपालांच्या हस्ते नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या ‘नॉट फॉर प्रॉफिट’ संस्थांसाठी असलेल्या सोशल स्टॉक एक्सचेंजवर ‘सार्थक’ संस्थेचे लिस्टिंग करण्यात आले.

भारतात एकूण लोकसंख्येच्या २.२१ टक्के लोक दिव्यांग आहेत. आगामी जनगणना प्रथमच डिजिटल माध्यमातून होणार आहे. त्यामुळे देशातील दिव्यांगांची निश्चित संख्या समजेल व त्यानुसार त्यांच्या कल्याणासाठी योजना आखण्यास मदत होईल असे राज्यपालांनी सांगितले.

तंत्रज्ञान व कृत्रिम प्रज्ञा यामुळे आगामी काळात दिव्यांगांचे जीवन अधिक सुकर होईल व दिव्यांगता ही अडचण ठरणार नाही असे राज्यपालांनी सांगितले.

डॉ जितेंदर अगरवाल या दंत चिकित्सक व्यक्तीने दृष्टी गमावल्यानंतर हिम्मत न हारता ‘सक्षम’ ही दिव्यांग क्षेत्रातील मोठी संस्था उभारली याबद्दल राज्यपालांनी अगरवाल यांचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला सेवानिवृत्त केंद्रीय सचिव लव वर्मा, सिडबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप वर्मा, सार्थकच्या सल्लागार मंडळाचे सदस्य क्रिशन कालरा व जागतिक व्यापार केंद्राचे अध्यक्ष विजय कलंत्री उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

Sat Jul 27 , 2024
– माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राज्य शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई :- कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करताना आपण त्यांचे शौर्य कायम आठवणीत ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या युद्धात शहीद झालेल्या महाराष्ट्रातल्या सहा जवानांचे देखील स्मरण केले. आज २५ व्या कारगिल विजय दिवसानिमित्त त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. माजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com