– मुंबई समाचारने विश्वसनीयता जपली – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
मुंबई :- कोणतेही स्थानिक वर्तमानपत्र चालवणे खूप कठीण काम आहे. २०० वर्षांपासून गुजराती भाषेमधून प्रकाशित होणारे मुंबई समाचार या वृत्तपत्राने विश्वसनीयता जपली आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथे केले.
मुंबईत हॉटेल सहारा स्टार, सांताक्रुझ येथे मुंबई समाचार या वृत्तपत्राचा २०३ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘मुंबई समाचार २०० नॉट आऊट डॉक्युमेंटरीचे’ लोकार्पण करताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य,रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, मुंबई समाचारचे व्यवस्थापकीय संचालक एच.एम. कामा, संचालक मेरवान कामा, मुंबई समाचार द्विशताब्दी समितीचे प्रमुख जितू मेहता, अभिनेता दिलीप जोशी, संपादक निलेश दवे आदी उपस्थित होते.
केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले, मुंबई समाचार या वृत्तपत्राने २०३ वर्षापूर्वीपासून आतापर्यंत वाचकांना अचूक माहिती पोहोचवली आहे. सामाजिक क्षेत्रात मुंबई समाचार वृत्तपत्राने महत्वपूर्ण योगदान दिले आहे. गुजराती भाषा, पत्रकारिता, साहित्य टिकवण्याचे कार्य मुंबई समाचारने केले आहे. मुंबई समाचारने बनवलेल्या डॉक्युमेंटरीचे हिंदी आणि इंग्रजी भाषेतही अनुवादित करण्यात यावे, जेणे करून दोनशे वर्षाचा इतिहास संपूर्ण देशाला समजेल, अशा सूचनाही केंद्रीय मंत्री श्री.शहा यांनी यावेळी केल्या.