– आमदार सुधाकर अडबाले यांचे कुलगुरूंना पत्र
नागपूर :- कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक हे महाराष्ट्रातील एकमेव संस्कृत विद्यापीठ आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ केंद्रीय विद्यापीठ व्हावे, अशी मागणी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी केली. विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सभेत त्यांनी पत्र देऊन कुलगुरू यांना राज्य व केंद्र सरकार ला प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने यासंदर्भात प्रस्ताव तयार करून तो राज्य व केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
आमदार सुधाकर अडबाले यांनी पत्रात म्हटले आहे की, संस्कृत भाषा, साहित्य आणि इतर भारतीय भाषांच्या विकासासाठी महाराष्ट्र राज्य आणि विद्यापीठ कटीबद्ध आहे. केंद्र शासनाच्या विविध योजना आणि भक्कम वित्तीय पाठबळाशिवाय संस्कृतचा विकास पाहिजे तेवढ्या जलद गतीने करता येणे शक्य नाही.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक १५ सप्टेंबर रोजी झाली. या बैठकीत आमदार अडबाले यांनी केलेल्या विनंतीवर चर्चा झाली. आमदार सुधाकर अडबाले यांनी त्यांच्या पहिल्याच सभेत केलेल्या प्रस्तावाचे व्यवस्थापन परिषद सदस्यांनी कौतुक केले. बैठकीत प्रस्तावाला मंजुरी देऊन तो राज्य व केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवला जाईल, असे कुलगूरूंनी आश्वस्त केले.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव संस्कृत विद्यापीठ आहे. विद्यापीठात संस्कृत भाषेच्या विविध शाखांमध्ये पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन पदवी अभ्यासक्रम चालवले जातात. सदर विद्यापीठाला विकासाच्या दृष्टीने नागपूर येथे ५० एकर जागा राज्य शासनाने उपलब्ध करून दिली आहे. केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळाल्यास विद्यापीठाला केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळेल. यामुळे विद्यापीठाचा विकास होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आमदार सुधाकर अडबाले यांनी व्यक्त केली.
या सभेत विद्यापीठाअंतर्गत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी कुलगुरू प्रो. हरेराम त्रिपाठी, कुलसचिव डॉ. रामचंद्र कुलकर्णी, अधिष्ठाता प्रो. मधुसूदन पेन्ना, हैद्राबाद विश्वविद्यालयातील प्रो. अम्बा कुलकर्णी, प्रो. पराग जोशी, प्रो. कविता होले, प्रो. ललिता जोशी, डॉ. दिनकर मराठे, प्रो. प्रसाद गोखले, डॉ. जयवंत चौधरी आदी सदस्यांची उपस्थिती होती.